मुंबई 15 ऑगस्ट: सध्या बॉलिवूडमध्ये सिनेमांची फारच दारुण अवस्था झाल्याचं दिसून आलं आहे. बड्या कलाकारांच्या सिनेमांना सुद्धा मिळणारा थंड प्रतिसाद वेगळंच चित्र दाखवत आहे. या आठवड्यात दोन मोठ्या बॉलिवूड स्टार आमिर खान आणि अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर येऊन धडकले आहेत. आमिरचा लाल सिंग चड्ढा तर अक्षयचा रक्षाबंधन सिनेमा रिलीज झाला आहे. अशा दोन बॉलिवूड कलाकारांचे सिनेमे असतानाही साऊथच्या छोट्या बजेटची फिल्म भाव खाऊन जाताना दिसत आहे. आमिर आणि अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर थंड कामगिरी करत असताना साऊथचा ‘सीता रामम’ सिनेमा एकदम दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दुलकर सलमान मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदानाचा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सिनेमा चांगला गल्ला जमवताना दिसत आहे. सीता रामम ही एक प्रेमकथा असून यामध्ये मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एका तेलगू सिनेमात झळकली आहे. यामध्ये दुलकर आणि मृणाल यांची जोडी सुद्धा प्रेक्षकांना चांगलीच आवडली असून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सीता रामम हा एक पिरियड drama आहे. 1960 मधील ही एक लव्हस्टोरी असून यामध्ये एक आर्मी ऑफिसर आणि त्याच्या आयुष्यात निनावी चिठ्ठीतून आलेली मुलगी यांच्यातील प्रेमकहाणी दिसून येत आहे. सिनेमाचं बजेट हे तीस करोडच्या आसपास होतं असं समोर आलं आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 50 करोडचा गल्ला जमवला असल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे साऊथच्या अनेक सिनेमांनी मागच्या सहा महिन्यात लक्षणीय कामगिरी केली आहे. रॉकिंग स्टार यशचा KGF 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी करण्यात यशस्वी झाला. तर त्यानंतरही साउथचे सिनेमे बॉलिवूडवर भारी पडायचा सिलसिला सुरूच आहे हे दिसून आलं आहे. एकीकडे बॉलिवूडच्या सिनेमांना बॉयकॉट करायची मागणी सुद्धा जोर धरत असल्याने त्याचा परिणाम सिनेमांवर होत आहे. जिकडे साउथचे सिनेमे पन्नास कोटींचे आकडे सहज गाठत आहेत तिकडे बॉलिवूडचे सिनेमे कमाई करायला तरसताना दिसत आहेत. हे ही वाचा- बॉलिवूडचे बडे स्टार KGF 2 च्या Yash समोर फेल; रिलीजनंतरही रॉकीची जादू कायम सध्या अनेक साउथचे कलाकार बॉलिवूडमध्ये एंट्री करताना दिसत आहेत. विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, विजय सेतुपती असे अनेक कलाकार येत्या काळात बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. आता बॉलिवूडची बुडती नैय्या कोण वाचवणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. येत्या काळात बॉलिवूडमध्ये ब्रह्मास्त्र सिनेमाबद्दल आतुरता दिसून येत आहे. हा बिगबजेट सिनेमा तरी बॉलिवूडचं नशीब बदलणार का हे पाहावं लागेल.