मुंबई, 29एप्रिल- प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. अतिशयोक्त व्हीएफएक्स इफेक्ट्समुळे या चित्रपटावर प्रेक्षकांनी जोरदार टीकासुद्धा केली होती. या चित्रपटाचे अनेक मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. आता, सीता नवमीच्या शुभ मुहूर्तावर, निर्मात्यांनी एक नवीन मोशन पोस्टर रिलीज केला आहे ज्यामध्ये क्रिती सेनन सीता माईच्या रुपात दिसून येत आहे. नुकतंच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये क्रिती सेननची ओळख जानकी देवीच्या रुपात करुन देण्यात आली आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर “सिया रामची धार्मिक गाथा” या कॅप्शनसह सुंदर व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये क्रिती सेनने फिकट केशरी रंगाची साडी परिधान केलेली दिसून येत आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्रीच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर निरागस हावभाव आहेत. या मोशन पोस्टरमध्ये लोकप्रिय गायक असणाऱ्या सचेत-परंपरा या जोडीने संगीतबद्ध केलेल्या ‘राम सिया राम’चं सुंदर संगीत ऐकायला मिळत आहे. (हे वाचा: Prabhu Deva: दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नीसोबत दिसले प्रभू देवा; कोरोना काळात गुपचूप केलेलं लग्न ) क्रिती सेननने सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करताच चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव सुरु केला आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहलंय, “या रुपात तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.” दुसर्याने लिहलंय, “मी तुझ्या लूकने पूर्णपणे आश्चर्यचकित झालो आहे. किती सुंदर आहे हा लूक’. अशा अनेक प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत करत आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर करत आहेत. येत्या 16 जून 2023 रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते 17 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहेत. महत्वाचं म्हणजे आदिपुरुषचा ट्रेलर नवीन बदलांसह सुधारित आवृत्तीसह प्रदर्शित केला जाणार आहे. क्रितीशिवाय या चित्रपटात प्रभास आणि सैफ अली खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणाचं सिनेमॅटिक रुपांतर आहे.