मुंबई, 03 डिसेंबर : अभिनेते शरद पोंक्षे हे व्यक्तिमत्त्व मराठी चित्रपटसृष्टीतील एका अर्थाने अभिनयाचं दैवत आहे असं म्हणता येईल. त्यांची अभिनयक्षमता तर सर्वाना ठाऊक आहेच पण त्यांचं थेट व आक्रमक बोलणं, डोळ्यातून दिसणारा तडफदार अभिनय याचे सगळेच फॅन्स आहेत. भूमिका नायकाची असो वा खलनायकाची शरद पोंक्षे प्रत्येक भूमिकेला समान न्याय देतात. आता नेहमी तडफदार भूमिका साकारणारे शरद पोंक्षे आता स्त्री वेशात दिसणार आहेत. कपाळाला कुंकू, नाकात नथ आणि खांद्यावरून पदर घेतलेला त्यांचा फोटो नुकताच समोर आला आहे. त्यामुळे शरद पोंक्षेच्या या भूमिकेबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेते शरद पोंक्षे सध्या झी मराठीवरील 'दार उघड बये' या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय होताना दिसतेय. पुरुषी अहंकार बाळगणारे रावसाहेब खलनायक असूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता ५ डिसेंबरपासून 'दार उघड बये' चा ऍक्शन पॅक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटणार आहे.
हेही वाचा - Samruddhi Kelkar : मालिकेचा निरोप घेताना समृद्धी केळकरला अश्रू अनावर, म्हणाली 'न कळत...'
मुक्ता सांरंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. कोंडून ठेवलेल्या सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला रावसाहेब सारंग आणि मुक्ताला भेटू देत नाहीत. तर इकडे आर्याचे आई बाबा नगरकरांच्या घरी येतात, रावसाहेब त्यांना शब्द देतात की आर्याच नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.
रावसाहेब मुक्ता-सारंगसमोर प्रत्येकवेळी नवीन आव्हानं उभी करणार आहेत आणि या आव्हानांना मुक्ता सडेतोड उत्तर देणार आहे, यात तिला नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे, मुक्ता ने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे कुठंतरी रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊन ते अतिशय खालच्या पातळीला उतरणार आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत.
या बाईच्या वेशातील शरद पोंक्षेचा फोटो आता समोर आला आहे. या फोटोत संपूर्ण स्त्री वेशात असलेल्या रावसाहेबांच्या डोळ्यात अहंकार मात्र तोच आहे. शरद पोंक्षेचा हा वेष पाहून मालिका पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या मोठ्या ट्विस्टमुळे आता मालिकेला चांगलंच रंजक वळण लागणार आहे.
आता मालिकेत मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देणार का? सोबत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? मुक्तांसमोरील आव्हानांना तिला सारंगची साथ कशी मिळेल. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Sharad ponkshe, Zee Marathi, Zee marathi serial