मुंबई, 03 जुलै : बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. 2020 या वर्षात मनोरंजन क्षेत्राला मोठे धक्के पचवावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने आत्महत्या केली. हा धक्का अजून विसरता आला नाही आहे, त्यातच आज बॉलिवूडच्या 'मास्टरजी' प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा 1.52 मिनिटांनी कार्डियाक अरेस्टमुळे सरोज खान यांचा मृत्यू झाला. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे त्यांना वांद्रे याठिकाणच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अचानक रात्री त्यांची तब्येत बिघडली आणि शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
(हे वाचा-VIDEO : माधुरी दीक्षितच्या 'या' सुपरहिट गाण्यांसाठी आठवणीत राहतील 'सरोज खान')
दरम्यान 14 जून रोजी सुशांतच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. त्यावेळी सरोज खान यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. त्यांनी सुशांतचाय फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली होती. त्या असं म्हणाल्या होत्या की, 'मी कधी सुशांतबरोबर काम केले नव्हते, पण मी त्याला अनेकदा भेटले होते. मला धक्का बसला आहे की तु हे पाऊल का उचलले? मला कल्पना नाही करता येत आहे की यामुळे त्याचे वडील आणि बहिणींवर काय परिणाम होईल'
तसच त्या म्हणाल्या होत्या की, 'तु (सुशांत) कोणत्याही मोठ्या व्यक्तीशी बोलायला हवं होते, ज्यांनी तुझी मदत केली असती आणि तुला पाहून आम्हाला आनंद झाला असता. मला तुझे सर्व चित्रपट आवडायचे आणि तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहीन'. सरोज खान यांनी ही भावुक पोस्ट शेअर करून बॉलिवूडचा हरहुन्नरी आणि हुशार अभिनेता सुशांतला श्रद्धांजली वाहिली होती.
(हे वाचा-प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम)
सरोज खान यांनी 4 दशकांहून अधिक काळासाठी बॉलिवूडमध्ये नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या काळातील सुपरहिट कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 'मास्टरजीं'नी 2000 पेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली आहेत.
संपादन - जान्हवी भाटकर