मुंबई, 30 जानेवारी : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सर्वांचा लाडका अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. संदीप सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड फॉलो करत असतो. रिल्स व्हिडीओ शेअर करत असतो. इतकंच नाही तर एखाद्या विषयावर त्याचं मत देखील तो स्पष्टपणे मांडत असतो. संदीप कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरत देखील असतो. प्रवासातील अनेक गमती जमती तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच संदीप प्रवास करत असताना रस्त्यात त्याला भेटलेल्या आजीला त्यानं मदत केली. संदीपनं त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यानं जे केलं त्यामुळे संदीपचं चांगलंच कौतुक देखील होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी त्यांच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर पाडली आहे. या अभिनेत्याने अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशी तिहेरी माध्यमं अभिनयाने गाजवली आहेत. त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच पण आता महाराष्ट्राबाहेरही त्याच्या अभिनयाची दखल घेतली गेली आहे. एकंदरीतच मराठी मातीतील सच्चा कलाकार म्हणून संदीप पाठकचं नाव अग्रणी घेतलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता संदीपने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
हेही वाचा - उर्मिला निंबाळकरने मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? स्वतःच सांगितलं मनोरंजन सृष्टीचं भयाण वास्तव
नुकतंच संदीपनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संदीप शूटिंगला निघाला होता. तेव्हा रस्त्यात त्याला एक आजी भेटल्या ज्यांच्या ज्या गावाला जायचं होतं त्यांची बस सुटली होती. त्यांना संदीपने लिफ्ट दिली आणि स्वतःच्या गाडीत त्या गावी सोडलं. या प्रवासादरम्यान संदीपने त्या आजीसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतलं. त्यांची प्रेमाने चौकशी केली. संदीपने केलेल्या या कृतीने त्या आजी भारावून गेल्या. त्यांच्या डोळ्यात त्याला पाहून मुलाच्या आठवणीने पाणी तरळलं. संदीपने शेवटी त्यांचे आशीर्वाद देखील घेतले.
शुटींग ला जात असताना ही गोड आजी भेटली, प्रवासात तिच्यासोबत गप्पा झाल्या आणि आजीचे आशिर्वाद मिळाले. अजून काय हवं……… #आजी #प्रवास #sandeeppathak #actorsandeeppathak #म #मराठी pic.twitter.com/XALHffuuC5
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) January 30, 2023
संदीपने केलेल्या या कृतीने चाहतेही त्याचं कौतुक करत आहेत. संदीपचा हा मनमोकळेपणाचं भाव खाऊन जातो. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. ते या व्हिडिओवर 'ग्रेट वर्क, कौतुकास्पद, गावाकडचा आपला माणूस, खरा हिरो' अशा कमेंट्स करत आहेत.
संदीप पाठक नुकताच झी मराठीवरील 'डान्स महाराष्ट्र डान्स लिट्ल चॅम्प्स' या शोचं सुत्रसंचालन करताना दिसला होता. तसेच श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्यासोबत तो 'आपडी थापडी' या चित्रपटात देखील झळकला होता. तसेच त्याच्या 'वऱ्हाड निघालं लंडनला' या नाटकाचे प्रयोग देखील महाराष्ट्रभर होत आहेत. आता येणाऱ्या काळात त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.