मुंबई, 11 जुलै : सध्या उत्तर भारतात पावसानं धुमाकूळ घातलाय. संततधार पावसामुळे मनाली, ऋषिकेश अशा गजबजलेल्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी फिरायला गेलेले पर्यटकही अडकून बसले आहेत. अशातच एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता देखील या पुरात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत भयंकर पूर परिस्थितीची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे चाहते सध्या चिंतेत आहेत. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता रुस्लान मुमताजही एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी मनालीला गेला होता. त्याने काही दिवसांपूर्वी मनालीमधून शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. मनालीच्या निसर्गाचे सुंदर फोटो देखील शेअर केले होते. पण नंतर परिस्थिती बदलली. मनालीत पावसानं थैमान घातलं आणि या सुंदर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे रुस्लानही तिथेच अडकला आहे. रुस्लानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शहरातील परिस्थितीबाबत अपडेट शेअर केले आहे.
पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मनाली ते चंदीगडला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पूर किती धोकादायक आहे हे अभिनेत्याने व्हिडिओमध्ये दाखवले आहे. पहिल्या फोटोत रुस्लानने, “माझ्यामागचा रस्ता आता अस्तित्वात नाही.” असं म्हटलंय तर पुढच्या पोस्टमध्ये, रस्ता कसा पाण्यात बुडाला ते सांगितलं आहे. मराठमोळ्या दिग्दर्शकाचा पहिलाच हिंदी सिनेमा हिट; काही दिवसातच पार केला 100 कोटींचा टप्पा रुस्लानने पूरग्रस्त ठिकाणचे अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये त्याने कुठे आसरा घेतला आहे हेही दाखवले आहे. व्हिडिओमध्ये रुस्लान आपल्या मित्रांसोबत जेवण करताना दिसत होता. त्याने पुरातून वाचत एका गॅरेजमध्ये आसरा घेतला होता. त्याने ‘रात्रीसाठी घर.’ असं म्हणत हा फोटो शेअर केला होता. त्याने पुढे कोसळलेला रस्ता दाखवत ‘हा तोच रस्ता आहे जो मनालीला चंदीगडला जोडतो.’ असं म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मला कधीच वाटलं नव्हतं की मी मनालीमध्ये खरंच अडकून पडेन जिथे नेटवर्क नाही. घरी परत जाण्याचा कोणताही मार्ग नाही कारण रस्ते ब्लॉक आहेत आणि मी शूटिंग देखील करू शकत नाही. एका सुंदर ठिकाणी मी खूप कठीण परिस्थितीत अडकलो आहे. मला नक्की आनंदी व्हावं की दुःखी असावं कळत नाहीये” असं त्याने म्हटलं आहे. अभिनेत्याची ही परिस्थिती पाहून चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत. दुसरीकडे मनालीतील परिस्थितीबद्दल सांगायचे तर, मुसळधार पुरामुळे अनेक हॉटेल, घरे, वाहने आणि प्रमुख रस्ते वाहून गेले आहेत. या हिल स्टेशनवर अजूनही रेड अलर्ट सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.