रिंकू राजगुरूची सैराट सिनेमातली आर्ची अशी ओळख जरी असली तरी तिच्या नावालाही आज स्वतंत्र ओळख आहे. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे रिंकूशिवाय दुसरं कोणीच उत्तमरित्या सांगू शकत नाही.
सैराट, कागर अशा सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली रिंकू सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती नियमीत आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
नुकतेच तिने आपल्या खास फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो एवढे सुंदर आहेत की सैराटमधली आर्ची हीच का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल.
साधेपणातही किती नाविण्य असतं हे रिंकूच्या या फोटोंकडे पाहून कळतं. झी टॉकिजच्या एका कार्यक्रमासाठी रिंकू खास तयार झाली होती. रिंकूने क्रिम रंगाचा गाउन घातला होता आणि कमीत कमी मेकअप केला होता आणि गाउनला साजेसे कानातले तिने घातले होते. तिचा संपूर्ण लुक जरी साधा असला तरी तिने आपल्या मादक अदांनी आणि डोळ्यांच्या हावभावांनी फोटोला चारचाँद लावले होते.
रिंकू राजगुरूच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तिचा कागर सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. आता लवकरच तिचा मेकअप हा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
गणेश पंडित लिखीत आणि दिग्दर्शित मेकअप सिनेमाच्या या टीझरमध्ये रिंकू बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवर मद्यपान करताना दिसते. मद्यधुंद अवस्थेत ती शहराला आणि घरच्यांना शिव्याही देत आहे. तिला मेकअप करायला न दिल्याचा राग तिच्या प्रत्येक वाक्यात दिसतो. हा टीझर पाहून शोले सिनेमातील धर्मेंद्र यांच्या त्या सीनची आठवण आल्यावाचून राहत नाही. टीझरवरून सिनेमाचा विषय नक्की काय असणार याचा अंदाज बांधता येत नसला तरी विषय वेगळा असेल असेच प्रेक्षकांना वाटत आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून गणेश पंडित दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. गणेशने याआधी अनेक नावाजलेल्या सिनेमांसाठी आणि मालिकांसाठी लेखन केले आहे. यात बालक पालक (२०१२), येल्लो (२०१४), बाळकडू (२०१५) आणि हिचकी (२०१८) या सिनेमांचं लेखन केलं आहे.

)







