• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, इन्स्टाग्रामवर दिली होती धमकी

रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, इन्स्टाग्रामवर दिली होती धमकी

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अशी पोस्ट देखील केली होती की, तिला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत. यासंदर्भात तिने तक्रार दाखल केली होती.

  • Share this:
    मुंबई, 19 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर सोशल मीडियावर बरेच वादंग निर्माण झाले आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी नेपोटिझमवर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी सुशांतच्या जवळच्या व्यक्तींना त्याच्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. दरम्यान त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrabory)ला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अशी पोस्ट देखील केली होती की, तिला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत. याबाबत तिला धमकी देणाऱ्या एका सोशल मीडिया अकाउंटचा फोटो देखील तिने शेअर केला होता. दरम्यान आता तिने केलेल्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये दोन इन्स्टाग्राम अकाउंटधारकांविरूद्ध अश्लील संदेश पाठविणे आणि धमकी देणे यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा-सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी फिल्ममेकर आदित्य चोप्राची 3 तास चौकशी) सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सुशांतच्या आठवणीत तिने शेअर केलेल्या एका पोस्टवरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे तिला खुलेआम धमक्या मिळण्याचे सत्र देखील सुरूच होते.  या ट्रोलिंगला आणि धमक्यांना कंटाळून रिया चक्रवर्तीने एक पोस्ट केली होती. सायबर सेलने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती रियाने केली होती. रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक इन्स्टा चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या युजरने तिचा बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप तिने या पोस्टच्या माध्यमातून केला होता. तिला आलेल्या या मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'जर तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा रेप आणि खून केला जाईल. मी त्याकरता लवकरच माणसं पाठवेन'.
    ही पोस्ट शेअर करताना रियाने अशी माहिती दिली होती की तिने यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली आहे. रियाने ही पोस्ट शेअर करताना असे म्हटले होते की, 'मला पैशांसाठी लालची बोलण्यात आलं तरी मी शांत होते, मला वाईट शिव्या देण्यात आल्या मी शांत होते, खुनी बोलण्यात आलं तरीही मी शांत होते. पण माझी शांतता तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार कसा काय देते की तुम्ही माझा बलात्कार आणि खून कराल?' रियाने या पोस्टमध्ये सायबर सेलला देखील टॅग केले आहे. दरम्यान कोणत्या दोन इन्स्टाग्राम होल्डर विरोधात सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळाले नाही आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: