'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर रेणुका शहाणेंचा सरकारला सवाल

'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर रेणुका शहाणेंचा सरकारला सवाल

कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकाम बीएमसीने तोडण्यास सुरुवात केल्यानंतर त्याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'हा अनावश्यक ड्रामा गरजेचा आहे का?' असा सवाल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकाम तोडल्याचं प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलं असून मुंबई महापालिकेच्या कारवाईला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती दिली आहे. कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या एकंदरित घटनेबाबत जनमानसातून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. काहींनी याप्रकरणी कंगनाची बाजू घेतली आहे तर काहींनी बीएमसीने केलेल्या कारवाईची.

ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्री रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी देखील याबाबत आपले मत मांडले आहे. रेणुका शहाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटमध्ये टॅग करत याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

(हे वाचा-एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप)

त्यांनी असे म्हटले आहे की, 'मला जरी कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नसले तरीही सूडभावनेने बीएमसीने केलेल्या उध्वस्ततेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतके खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. @CMOMaharashtra कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण पँडेमिकचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?'.

रेणुका शहाणेंचे हे ट्वीट अत्यंत समर्पक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दरम्यान रेणुका शहाणे यांनी याआधी कंगनाने केलेल्या 'PoK' मुद्द्यावरून तिची कानउघडणी केली होती. 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असं वक्तव्य कंगनाने केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि रेणुका यांच्यामध्ये ट्वीटवॉर देखील पाहायला मिळाले होते.

(हे वाचा-आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने संपवले जीवन, गळफास घेऊन केली आत्महत्या)

दरम्यान अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल झाली असून त्यावेळी मुंबई विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिच्या घरासमोरून जाणारे तीन रस्ते देखील मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तिच्या घराबाहेर देखील मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 9, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या