मुंबई 13 मार्च: रश्मी देसाई (Rashami Desai) ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध मालिकांमधून तब्बल एक दशक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रश्मी आजही कामाच्या शोधात आहे. उत्तम अभिनय क्षमता असतानाही बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्याची संधी तिला अद्याप मिळालेली नाही. काम मागायला गेल्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक टिव्ही कलाकारांना आम्ही काम देत नाही असं म्हणून अपमान करतात असा खळबळजनक आरोप तिनं केला आहे. (bollywood is humiliating and insulting)
उत्तरन या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रश्मी आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच तिनं एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं आपल्या करिअरमधील हा थक्क करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “टीव्ही कलाकारांना बॉलिवूडमध्ये निम्न दर्जाचे कलाकार असं समजलं जातं. वारंवार आमचा टीव्ही कलाकार म्हणून अपमान केला जातो. मी अनेकदा बॉलिवूड चित्रपटांच्या ऑडिशनला गेले आहे. मात्र ऑडिशन पास करुनही काम मिळत नाही कारण आम्ही टीव्हीचे कलाकार आहोत. मालिकांमध्ये काम करणाऱ्यांनी तिथंच काम करावं या ठिकाणी प्रयत्न करु नये असं म्हणत आमचा अपमान केला जातो. आम्हाला देखील काम करण्याचा पुर्ण अधिकार आहे. चित्रपटांमध्ये नव्या अभिनेत्रींना संधी दिली जाते अन् आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय आमच्यात क्षमता आहे. आम्ही देखील ग्लॅमरस दिसतो तरी देखील आमच्यासोबत भेदभाव केला जातो. असा अनभव घेऊन आता मी थकले आहे.”
अवश्य पाहा - बॉक्स ऑफिस कलेक्शन ठणठण गोपाळ; जान्हवी कपूरचा ‘रुही’ ठरला सुपरफ्लॉप
रश्मीनं 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली. दरम्यान 2008 साली तिनं रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिनं मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे. मात्र इतका अनुभव असताना देखील तिला अद्याप बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Shocking news, Tv actress, Unemployment