मुंबई, 24 ऑगस्ट : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील कपल सध्या प्रचंड चर्चेत आहे. या दोघांचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा चित्रपट येणार म्हटलं कि त्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू होते. वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांची मन जिंकून चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येते. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. ब्रम्हास्त्र’च्या प्रमोशनसाठी देखील असाच फंडा वापरलेला दिसत आहे. सध्या आलिया भट्ट प्रेग्नन्सी मुळे ब्रम्हास्त्र च्या प्रमोशनसाठी जास्त दिसत नाही. पण रणबीर कपूर तेवढ्याच जोशात चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. तसेच रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘शमशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णतः फ्लॉप झाला आहे. त्यामुळे त्याने आता ब्रम्हास्त्र’च्या यशासाठी कंबर कसली आहे. बुधवारी, 24 ऑगस्ट रोजी रणबीर चेन्नईमध्ये ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. यावेळी रणबीरसोबत साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता नागार्जुनही दिसले. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटामध्ये साउथचे सुपरस्टार नागार्जुन हेही दिसणार आहेत. त्यामुळेच चेन्नईत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन झाले. या प्रमोशनसाठी आलेल्या चित्रपटाच्या टीमचे चेन्नईमध्ये ढोल-ताशांसह धमाल स्वागत झाले.
यावेळी रणबीर कपूर नेहमीप्रमाणे कॅज्युअल स्टायलिश लूकमध्ये दिसला. पण चर्चा झाली ती वेगळ्याच गोष्टीची. यावेळी रणबीर कपूरने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला. होय, प्रमोशन दरम्यान, अभिनेता नागार्जुन आणि राजामौली यांच्यासोबत बसला आणि चक्क केळीच्या पानांवर दिल्या जाणार्या पारंपारिक पद्धतीने स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. रणबीरने प्रसिद्ध आणि पारंपरिक साऊथ इंडियन जेवण जेवून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हेही वाचा - Ranbir kapoor : रणबीरने मागितली जाहीर माफी; पण असं काय म्हणाला होता अभिनेता? रणबीर कपूर सध्या त्याची पत्नी आलिया भट्टवर केलेल्या कमेंटमुळे तुफान चर्चेत आहे. यूट्यूबवर लाइव्ह चर्चेदरम्यान, रणबीरने आलियाला तिच्या बेबी बंपकडे पाहताना तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट केली होती. त्यानंतर फॅन्सनी रणबीरवर टीका करण्यास सुरुवात केली होती. पण चेन्नईमध्येच पत्रकार परिषदेत रणबीरने सर्वांची जाहीर माफी मागितली त्याचीही प्रचंड चर्चा सध्या होत आहे. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अयान मुखर्जीने याचे दिग्दर्शन केले आहे. ‘बाहुबली’ आणि ‘RRR’ या चित्रपटांचे निर्माते एसएस राजामौली हा चित्रपट चारही भाषांमध्ये सादर करत आहेत.