मुंबई, 2 फेब्रुवारी : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मोठी हस्ती ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. रमेश देव 93 वर्षांचे होते. त्यांचा तीन दिवसांपूर्वीच 93 वा वाढिदिवस साजरा करण्यात आला होता. पण त्यानंतर आज अनपेक्षित घटना घडली. रमेश देव यांना आज हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांनी अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधानाचं वृत्त समजल्यानंतर मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते भरत जाधव यांचे देव कुटुंबासोबत खूप जवळचं आणि एक वेगळं भावनिक नातं आहे. भरत जाधव यांनी रमेश देव यांच्या निधनानंतर ‘न्यूज 18 लोकमत’ला प्रतिक्रिया देताना भावनिक प्रतिक्रिया दिली. “खूप दुखद आणि त्रास देणारी ही घटना आहे. एक राजा माणूस हरपला. आम्ही एक-दोन फिल्म सोबत केल्या होत्या. ते सर्वांना मित्र म्हणून हाक मारायचे. खूप वर्षांनी लहान असूदे किंवा मोठे असले तरी ते अरे मित्रा कसा आहेस? अशी हाक द्यायचे. त्यांनी आपलं वय जास्त आहे असं कधी दाखवलं नाही. मी किती काम केलंय याचा अट्टाहास नसायचा. आताचे मुलं काय करतात किंवा काय करायला हवं यावर ते चर्चा करायचे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. त्यांचा आताच वाढदिवसही साजरा झाला होता. अजिंक्य दादांसोबत खूप चांगले संबंध आहेत”, असं भरत जाधव म्हणाले. ( ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी चित्रपटसृष्टी शोकाकूल ) “मी सतत, चित्रपट आणि नाटक करायचो. त्यासाठी त्यांनी मला एक स्प्रे दिला होता. सतत धावपळ करतो म्हणून हा स्प्रे चेहऱ्यावर मारत जा. त्या स्प्रेमधून हवा आणि पाणी यायचं. त्याच्याने खूप बरं वाटायचं. त्यांना मला ते गिफ्ट दिल्याचा मला खरंच आनंद वाटलेला. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. यामागूनच त्यांच्या ताजेतवानं राहण्याचं रहस्य जाणवलं होतं”, असं देखील भरत जाधव म्हणाले. ‘मी मोठा भाऊ गमावला’, अशोक सराफांची भावनिक प्रतिक्रिया “मराठी चित्रपटसृष्टीची ही खूप मोठी हानी आहे. माझ्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटाची सुरुवात ही त्यांच्यासोबतच झाली होती. माझ्या आयुष्यातील पहिल्याच शॉट हा त्यांच्याबरोबर होता. त्यावेळी ते मराठीतले फार मोठे हिरो होते. त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर सिनेमा म्हणजे काय असतं ते कळलं होतं. मी त्यांच्यासोबत बरेच चित्रपट केले. त्यांचं आणि माझं खूप वेगळं नातं होतं. ते मला धाकला भाऊ मानायचे. मी त्यांना रमेश भैय्या असंच म्हणायचो. त्यांचं वागणंही खूप चांगलं होतं. ते समजावून सांगायचे. माझ्याबाबत त्यांना अतिशय चांगल्या सद्भावना होत्या. मला ते सतत सल्ले द्यायचे. मी मोठा भाऊ गमावला. परवा त्यांचा वाढदिवस होता. मी नेहमी त्यांना फोन करतो. त्यादिवशीही त्यांना फोन केला होता. त्यांनी फोन घेतला. पण त्यावेळी त्यांचा आवाज फार थकलेला होता. ते हळूहळू बोलत होते. मी म्हटलं, भैय्या काय झालं तुझी तब्येत बरी नाही का? ते म्हणाले, बरी आहे. आमचं चांगलं बोलणं झालं. मी शुभेच्छा दिल्या. पण मला वाटलं नव्हतं की मला दोन दिवसांनी असं ऐकायला मिळेल. अत्यंत वाईट बातमी आहे. ही माझी सर्वात मोठी वैयक्तिक हानी झाली आहे. मी माझा मोठा भाऊ गमावला”, अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.