नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका सुटकेसमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा उलगडा जेव्हा झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. कारण या घटनेमागील सत्य तितकंच भयानक आहे. संबंधित घटना ही वरवर पाहता हत्येची वाटत होती. पण या घटनेमागे समलैंगिक संबंध आणि त्यातून ब्लॅकमेलिंग सारखे मुद्दे समोर आले. त्यातूनच केलेल्या तपासातून सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यावसायिकासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुण हा दक्षिण दिल्लीतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाकडे सेल्समन म्हणून काम करत होता. त्याच व्यावसायिकासोबत तो समलैंगिक संबंधांमध्ये होता. त्यांच्यातील संबंध हे काही काळ चांगले होते. पण काही दिवसांनी त्या तरुणाने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यातून तो व्यावसायिकाकडे वारंवार पैसे मागायचा. त्याच्या याच त्रासातून व्यावसायिकाने तरुणाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मृतक तरुणाचा जेव्हा मृतदेह सूटकेसमध्ये सापडला तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यातून मृतक तरुण हा शेवटच्यावेळी त्या व्यावसायिकासोबत दिसला होता. त्यानंतर पोलिसांनी व्यावसायिकाला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सुरुवातीला आरोपी व्यावसायिक हा काहीही खोट्या गोष्टी सांगत होता. पण पोलिसांनी जेव्हा पोलीसी खाक्या दाखवला तेव्हा भळाभळ बोलू लागला. त्याने सांगितलं की मृतक तरुणाने त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या दरम्यान त्याने लपून नकळत व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून तो ब्लॅकमेल करत होता. आरोपी व्यावसायिक हा विविहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याने आपण बदनामीला घाबरलो त्यातून संबंधित कृत्य केल्याची कबुली दिली. ( मुंबईमध्ये सिनेस्टाईल दरोडा, पिस्तुलच्या धाकावर लाखो रुपये लुटले, LIVE VIDEO ) आरोपीने सांगितलं की आपण तरुणाची हत्या 19 जानेवारीलाच करणार होतो. पण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी चेकिंग सुरु होती. त्यामुळे आपण 26 जानेवारीनंतर हत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रजासत्ताक दिनानंतर आपण आपल्या पुतण्याला बोलवून तरुणाची हत्या केली, अशा जबाब त्याने पोलिसांना दिला. आरोपीने खूप हुशारीने हत्येचा कट आखला होता. त्यासाठी त्याने आपल्या एका जवळच्या मित्राला आणि पुतण्याला बोलावलं होतं. त्याने त्यांना 28 जानेवारीला खुर्जा येथून बोलावलं होतं. एका गेस्ट हाऊसमध्ये हत्येचा कट रचला गेला होता. तिथेच तरुणाचा गळा दाबून हत्या करण्यात आली. आरोपींनी हत्या केल्यानंतर तरुणाच्या मृतदेहाला एका सूटकेसमध्ये टाकलं. त्यानंतर आरोपींनी ती सूटकेस सरोजनी नगर मेट्रो स्टेशनजवळ एका सामसूम ठिकाणी फेकून दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.