मुंबई, 02 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अनेक देशांमध्ये कर्फ्यू आणि लॉकडाऊनची परिस्थीती आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाने सबंध जगाला पोखरलं आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी कोरोनाला गांभीर्याने न घेता त्याबाबत एप्रिल फूल करणे म्हणजे अक्षम्यच आहे. तर ही चूक केली आहे, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने. त्यामुळे ट्विटरवर राम गोपाल वर्मावर टीका केली जात आहे आणि ट्रोल देखील करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या या गंमतीचे सोशल मीडियावर नकारात्मक पडसाद उठत आहेत. (हे वाचा- ‘…तर अभिनय करायचा विचार केला नसता’, अभिनेता सुबोध भावेची प्रतिक्रिया ) राम गोपाल वर्मा यांनी केलेली गंमत त्याच्या ट्रोलिंगचे कारण बनली आहे. झालं असं की राम गोपाल वर्माने काल म्हणजे 1 एप्रिलला असं ट्वीट केलं की, ‘माझ्या डॉक्टरांनी आताच मला सांगितलं आहे की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे’. अनेकांनी त्याचे हे ट्वीट गांभीर्याने घेतलं. कारण बहुतेक सेलिब्रिटींनी कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावरूनच दिली आहे.
My doctor just told me that I tested positive with Corona
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 1, 2020
त्याने काही वेळात दुसरं ट्वीट केलं आणि सांगितलं की ‘माफ करा मी तुम्हाला निराश केलं. त्याने आता पुन्हा मला सांगितलं की तो एप्रिल फूल करत होता. ही चूक त्याची आहे माझी नाही.’
राम गोपाल वर्माचा हा प्रताप त्याच्या कोणत्याच फॅन्सना रुचला नाही आहे. कोरोनाबाबतीत अशी गंमत करणं चुकीची असल्याचं सांगत त्यांनी अत्यंत वाईट शब्दात राम गोपाल वर्मावर टीका केली आहे. केलेली गंमत आपल्यावरच उलटल्याने राम गोपाल वर्माने ट्विटरवर माफी देखील मागितली आहे.