मुंबई, 16 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. एकच चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असणारे बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’ हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटातील टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तो ही एका खास व्यक्तीच्या आवाजात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भारदस्त आणि दमदार आवाजात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर टिझर प्रदर्शित करण्यात आला. राज ठाकरे यांच्या आवाजातील टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीमध्ये राज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे. हेही वाचा - ‘मी आवाज दिलेल्या पहिल्या फिल्मवर बंदी आलेली’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित दोन तीन पार्टमध्ये चित्रपट आणणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी या मुलाखतीत केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित हे चित्रपट कसे असतील त्यात कोण अभिनय करेल याची माहिती येणाऱ्या काळात समजेल. पण सध्या राज ठाकरेंनी केलेल्या या घोषणेमुळे शिवप्रेमी आणि प्रेक्षक चांगलेच आनंदी झाले आहेत. या चित्रपटाला आवाज देण्याबाबत राज म्हणाले, ‘‘हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो 2003 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही.’’
या मुलाखतीमध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सांगितलं कि, ‘‘अभिजीत देशपांडे यांच्यासोबत काम करताना ते करेक्शन करताना थोडं अशी विनंती करायचे. त्यावरुन आमच्यात कदाचित थोडाफार वाद झाला असता. पण हिंदीमध्ये करताना माझ्यावर सोडा असं सांगितलं. मी आणि अजित भुरे सकाळी स्टुडिओत गेलो. सकाळी दहा वाजता गेलो. मला हवं तसं रेकॉर्ड केलं आणि त्यांना ऐकवलं. त्यावर ते म्हणाले की, छान झालं. ते चार-पाच ठिकाणं काही होती ते मी केलं", अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.