मुंबई, 3 मार्च : दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आता एक बायोपिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुप्रतीक्षित असा ‘मी वसंतराव’ हा सिनेमा घेऊन निपुण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. डॉ. वसंतराव देशपांडेंचा नातू आणि गायक राहुल देशपांडे यामध्ये वसंतरावांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान 'मी वसंतराव'साठी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी उत्सुक आहे. अनेकांनी या चित्रपटाबाबत असणाऱ्या भावना सोशल मीडियावर मांडण्यात आला.
दरम्यान सोमवारी मुंबईमध्ये या चित्रपटाच्या पोस्टर लाँचचा सोहळा पार पडला. यामध्ये दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता-गायक गायक राहुल देशपांडेंसह अनेकांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता पुष्कराज चिरपुटकर, व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सचे निखिल साने उपस्थित होते.
(संबंधित-आजोबांची भूमिका पडद्यावर साकारणार त्यांचाच नातू, 'मी वसंतराव'चं पोस्टर रिलीज)
दरम्यान या सोहळ्याची विशेष उपस्थिती म्हणजे प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन. या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांनी वसंतरावांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे या चित्रपटाची सुरूवात डॉ. वसंतरावांच्या शेवटच्या मैफिलीतील गाण्याने होणार आहे आणि या मैफीलीमध्ये झाकीर हुसेन यांनी तबल्याची साथ दिली होती. पोस्टर रिलीजदरम्यान या गाण्याची पहिली झलक देखील दाखवण्यात आली.
2013 पासून या चित्रपटाचं काम सुरू असल्याची माहिती यावेळी निपुणने दिली. एवढ्या महान कलाकाराचा जीवनपट उलगडण हे तसं कठीण काम होतं, पण त्याचबरोबर काही आर्थिक बाबींमुळे चित्रपट पूर्ण होण्यास इतका कालावधी गेला. आपल्या आजोबांशी अगदी जवळचं नातं असणाऱ्या राहुल देशपांडे यांनी देखील आजोंबांबाबत असंख्य आठवणी यावेळी सांगितल्या. राहुल सांगतात, ‘लहानपणी मला कुणी विचारलं की सर्वात जवळचं कोण? आई की बाबा? तर मी बाबा असं उत्तर द्यायचो. कारण मी माझ्या आजोबांना बाबा म्हणायचो. माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.’