Home /News /entertainment /

आजोबांची भूमिका पडद्यावर साकारणार त्यांचाच नातू, 'मी वसंतराव'चं पोस्टर रिलीज

आजोबांची भूमिका पडद्यावर साकारणार त्यांचाच नातू, 'मी वसंतराव'चं पोस्टर रिलीज

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'धप्पा' या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि भाडिपा फेम निपुण धर्माधिकारी आता एक बायोपिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुप्रतीक्षित असा ‘मी वसंतराव’ हा सिनेमा घेऊन निपुण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 3 मार्च : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'धप्पा' या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि भाडिपा फेम निपुण धर्माधिकारी आता एक बायोपिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुप्रतीक्षित असा ‘मी वसंतराव’ हा सिनेमा घेऊन निपुण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत संगीतकार डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निपुण या चित्रपटासाठी काम करत आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या संगीताचा वारसा जपणारी एक अख्खी पिढी आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांचे अनेक गुण त्यांचा नातू राहुल देशपांडे यांच्यामध्ये उमटले आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचा मोलाचा वाटा आहे.  डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील महान अभिनेते अशा अनेक भूमिका लीलया पेलल्या. त्यांनी अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या साऱ्यावर त्यांनी आपली छाप सोडली आहे. अशा महान कलाकाराच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याचं धाडस निपुण धर्माधिकारीने केलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. (हे वाचा-B'day Special : गाण्यासाठी लावली होती जीवाची बाजी, 3 मिनिटं रोखून धरला श्वास) विशेष म्हणजे वसंतराव देशपांडेचे नातू राहुल देशपांडे या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राहुल देशपांडेंची वेगळी अशी ओळख आहे. शास्त्रीय संगीतातील एक नावाजलेला चेहरा म्हणून राहुल देशपांडेंकडे पाहिलं जातं. अशावेळी वसंतरावांवर आधारित चित्रपटामध्ये राहुल यांची भूमिका उत्कंठा वाढवणारी आहे. नुकतच राहुल देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, 'मी आणि निपुणने पाहिलेलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित होईल’.
  निपुणने देखील या चित्रपटाबाबत भावूक पोस्ट शेअर केली आहे. तो असं म्हणतो की, ‘फार भरून आले आहे. अनेक लोकांच्या साथीने हा प्रवास आता अंतिम टप्प्यावर आला आहे. 'मी वसंतराव' या डॉ. वसंतराव देशपांडेंवरच्या चित्रपटचा टीझर उद्या येईल. नक्की पहा आणि प्रतिक्रिया कळवा.’
  दरम्यान 'मी वसंतराव'साठी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी उत्सुक आहे. या दोन्ही कलाकारांनी शेअर केलेल्या पोस्टरवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सुबोध भावे, सुकन्या मोने, सारंग साठे, सिद्धार्थ मेनन, अमृता खानविलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी याबाबत उत्सुक असल्याचा कमेंट्स केल्या आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Rahul deshpande

  पुढील बातम्या