मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर आधारित एक नवी कोरी वेबसिरीज ‘राजी-नामा’ ही ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. ‘रानबाजार’ (Raanbaazar webseries) या वेबविश्व हादरून सोडणाऱ्या एका हिट वेबसिरीजनंतर अभिजित पानसे (Abhijit Panse) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हे भन्नाट जोडी ‘‘राजीनामा’च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. ही कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित असून ‘राजी-नामा’ वेबसिरीजची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने आता लवकरच एक राजकीय सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजची आज घोषणा करण्यात आली असून त्यासंबंधीचा एक उत्सुकता वाढवणारा विडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खुद्द चिन्मयने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून या विडिओ शेअर केला आहे. अभिजित यांचं कौशल्य एका वेबसीरिजच्या यशातून झळकत आहे, तसंच चिन्मय मांडलेकर सुद्धा फॉर्मात आहे. एकीकडे चंद्रमुखी (Chandramukhi) सारख्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिल्यानंतर आता अभिजित पानसे यांच्यासोबत तो काय चमत्कार करून दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक नवं समीकरण बनत चाललं आहे. रानबाजारमध्ये सुद्धा त्यांनी राजकीय थरार दाखवत एक अत्यन्त महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. आधी प्रचंड ट्रोल झालेल्या या वेबसिरिजला रिलीजनंतर विलक्षण प्रतिसाद मिळाला. एवढंच काय तर मुख्यमंत्रांच्या राजीनाम्यावर आधारित वेबसिरीजमधल्या सीनला सध्याच्या राजकीय परिस्थितीला जोडून पाहिला जात आहे. त्याजोगे अभिजित पानसे यांना दूरदृष्टी होती असाही सवाल केला जात आहे. कदाचित हा एक योगायोग असू शकतो पण अभिजित यांचं कौशल्य नावाजलं जात आहे यात शंका नाही. हे ही वाचा- विवेक अग्निहोत्रीचा नवा कारनामा, एकीकडे मुखमंत्र्यांना शुभेच्छा तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला सुनावले बोल!
अभिजित यांची खासियत म्हणजे त्यांची योग्य विषयाला हात घालायची बुद्धी. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके आणि आऊट ऑफ द बॉक्स असतात. ‘रानबाजार’ला असलेल्या सद्य स्थितीच्या आशयाने प्रेक्षकांनी सिरिजला चांगलीच पसंती दर्शवली. ‘रानबाजार’च्या घवघवीत यशानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ कोणाचा आहे? तो मंजूर होणार का? नेमका कोणाकडे रोष असलेला पाहायला मिळतो? हे आणखी माहिती आल्यावर समोर येईलच. तूर्तास तरी एक चांगला विषय असणारी वेब सिरीज येऊ घातली आहे एवढं मात्र नक्की सांगता येईल.