मुंबई, 06 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी गाजवलेल्या नट म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाटक घराघरात पोहचवलेला, मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले. गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर चालणारच, ही खात्री निर्मात्याला असतेच असते. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. येत्या ६ नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात ते १२,५०० व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठणार आहेत. हे नाटक आहे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’. एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं. रंगभूमीवरील त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. नाटकाच्या १२,५०० व्या प्रयोगासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलेंच्या नाटकाचा १२,५०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी खास महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांच्या वतीने अभिनेते प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने अशी मागणी केली गेली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आधीच त्यांच्या नावाची शिफारस केली आहे असं उत्तर दिले. मराठी प्रेक्षकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हेही वाचा - Prashant Damle: अन् तो दिवस पुढची अडीच तीन वर्ष अशांतता घेऊन आला; प्रशांत दामलेंनी सांगितली ती कटू आठवण एखाद्या नटासाठी रंगभूमीवर १२,५०० प्रयोग पार पाडणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. हा प्रवास खडतर असणार हे निश्तित. त्यानंतर आता प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार मिळणं ही त्यांच्यासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसाठी अभिमानाची बाब आहे.
प्रशांत दामलेंना या प्रवासात अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढ्या वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आता रंगभूमी वरील त्यांच्या १२,५०० व्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला आहे. या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं आहे कि, ’ येत्या काही दिवसांतल्या माझ्या १२,५०० व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसं वाटतंय..?’ वगैरे वगैरे. पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलंच नाही. मला नाटक करायचं आहे, लोकांना नाटक दाखवायचं आहे एवढंच मला कळत होतं.तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचं कसं होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु नाटक आजवर काही थांबलेलं नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेलं. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला!’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.