मुंबई 5 जून: नागिण या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली होती. (Pearl V Puri in rape case) दरम्यान या संपूर्ण प्रकरणात प्रसिद्ध निर्माती एकता कपूर त्याच्या बाजूनं ठामपणे उभी राहिली आहे. पती-पत्नीच्या वादात त्याला अडकवलं जातंय. त्याच्या विरोधात खोटे आरोप केले जात आहेत, असा दावा एकतानं केला. शिवाय हा दावा सिद्ध करण्यासाठी त्या मुलीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
काय आहे या ऑडिओक्लिपमध्ये?
या ऑडिओक्लिपमध्ये एकता आणि त्या मुलीच्या आईचं संभाषण आहे. मुलीची आई देखील एक अभिनेत्री असून ती एकता कपूरच्या मालिकेत काम करते. तिनं पर्ल व्ही पुरीसोबतही काम केलं आहे. मुलीच्या वडिलांनी अभिनेत्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र ही तक्रार आईला मान्य नाही. आईनं अभिनेत्याची बाजू घेत तिचा घटस्फोटीत पती खोटं बोलतोय असा दावा केला. ती अभिनेत्री किती वाईट आई आहे हे सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण रचलं गेलंय असंही ती या ऑडिओक्लिपमध्ये म्हणाली आहे. या 11 मिनिटांच्या क्लिपमध्ये मुलीच्या आईनं वारंवार अभिनेत्याची बाजू घेत तिचा पती खोटं बोलत असल्याचा दावा केला. ही ऑडिओ क्लिप टेलिचक्कर या वेबसाईटनं युट्यूबवर शेअर केली आहे. या क्लिपमधील आवाज एकताचाच आहे याची पुष्टी नेटवर्क 18 ने केलेली नाही.
‘पर्ल विरोधात कट रचला गेलाय’; बलात्कार प्रकरणी एकता कपूरनं घेतली अभिनेत्याची बाजू
एकताचा दावा DCP पाटील यांनी फेटाळला
एकताचा हा दावा डीसीपी संजय कुमार पाटील यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी एकताला प्रत्युत्तर देत अभिनेत्याविरोधात ठोस पुरावा असल्याचा उलट दावा केला आहे. वृत्तमाध्यमांशी बोलताना डीसीपी म्हणाले, “ही केस सर्वप्रथम वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिथून आता वालिव पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. आरोपीचं निवेदन घेण्यात आलं आहे. आरोपी आणि पिडीत मुलीची आई एकाच शोमध्ये काम करत होते. त्या मुलीचं वय 12 वर्ष आहे. एकतानं केलेल्या दाव्यात तथ्य नाही. आमच्याकडे अभिनेत्याविरोधात ठोस पुरावे आहेत. हे सर्व पुरावे आम्ही लवकरच कोर्टात सादर करु. सध्या या प्रकरणावर आणखी चौकशी सुरु आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Ekta kapoor, Entertainment