मुंबई, 22 ऑगस्ट : झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ या पुरस्काराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा, स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या पुरस्कार सोहळ्याद्वारे केला जातो. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर हा दिमाखदार सोहळा पुन्हा परतला आहे. यावर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून उंच माझा झोका’ या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे. झी मराठीवर येत्या रविवारी हा सोहळा प्रदर्शित होणार आहे. त्याचा एक प्रोमो समोर आला आहे. पण या प्रोमोची सध्या प्रचंड चर्चा होतेय, कारण या पुरस्काराचे निवेदन यावर्षी कोणी कलाकार अभिनेत्री करणार नसून एक राजकारणी करणार आहे. ‘उंच माझा झोका’ पुरस्काराचे यंदाचं हे आठवे वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. या वर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे या सांभाळणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे निवेदकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही देखील सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही.
मनोरंजन विश्वातील विविध मंचावर अनेकदा राजकारणातील बड्या व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळते. अनेकदा विविध कार्यक्रमात हे राजकारणी सहभागी होतात. मात्र आता एखादा राजकारणी प्रथमच पुरस्कार सोहळ्याचे निवेदन करताना दिसणार आहे. त्यामुळे सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा प्रोमो सर्वत्र धुमाकूळ घालतोय. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता त्यांना या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेही वाचा - 4 Blind men : ‘एक नवा खेळ आणि चार नवे खेळाडू’; दगडी चाळ2 नंतर अंकुश चौधरीचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला पंकजा मुंडे या प्रोमोमध्ये ‘हा महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम आहे, म्हणून मला इथे येण्याचा मोह आवरला नाही.’ असं म्हणताना दिसत आहेत. नुकताच पंकजा मुंडे या झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. हा भाग प्रेक्षकांना पसंत पडला होता. आतापर्यंत पंकजा मुंडेंचं भाषण सर्वानी ऐकलं आहे. पण आता पंकजा निवेदकाची भूमिका कशी पार पाडतात हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘उंच माझा झोका पुरस्कार 2022’ हा कार्यक्रम 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. या कार्यक्रमात कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार पाहता येणार आहेत.