मुंबई, 06 एप्रिल : मालवणी भाषेची गोडीच वेगळी आहे. सध्या मालवणी भाषेबद्दलचं प्रेम जिकडे तिकडे दिसू लागलं आहे. सोशल मीडियामुळे आता रील्स आणि युट्यूबवर देखील मालवणी भाषेत बोलणारे अनेक लोक आणि त्यांचे अनेक चॅनेल्स पाहायला मिळतात. मालवणी भाषेची गोडी आपल्या मराठी इंडस्ट्रीत देखील तितकीच लोकप्रिय आहे. मालगुडी डेज असो किंवा रात्रीस खेळ चाले सारख्या मालिकेतही मालवणी भाषा ऐकायला मिळाली. मराठी रंगभूमीवर अशीच एक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ज्याचं नाव आहे ‘करून गेलो गाव’. तब्बल 10 वर्षांनी मालवणी भाषेतील हे नाटक पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 7 एप्रिलला नाटकाचा शुभारंभ होणार आहे. नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विनोदाचे बादशहा भाऊ कदम आणि ओंकार भोजने विनोदाचे चौकार षटकार लावणार आहे आणि ते ही मालवणी भाषेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेला ओंकार भोजने करून गेलो गावच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ओंकारचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. आपल्या पहिल्या नाटकासाठी ओंकार भोजने प्रचंड खुश आहे. काही दिवसांआधीच ‘सरला एक कोटी’ या सिनेमातून त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आता तो व्यावसायिक नाटकात काम करणार आहे. हेही वाचा - Maharashtrachi Hasyajatra: वनिता खरातनंतर शिवाली परबचं लग्न? ‘या’ अभिनेत्यासोबत पोहोचली डेटवर
तर कॉमेडीचे बादशाहा भाऊ कदम देखील आपल्या विनोदाच्या टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळवून हसवताना दिसणार आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून भाऊ प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आता नाटकातून देखील भाऊ कदम आपल्या विनोदाची आणि अभिनयाची जादू दाखवून देणार आहेत.
ओंकार भोजने आणि भाऊ कदमबरोबरच ‘करून गेलो गाव’ या नाटकात अभिनेत्री उषा साटम, नुपूर दूदवडकर, प्रणव जोशी, अनुष्का बोऱ्हाडे,सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर हे कलाकार देखील आहेत. तर महेश मांजरेकर यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. 10 वर्षांनी करून गेलो गाव हे धम्माल विनोदी नाटक नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन हे राजेश देशपांडे यांनी केलंय. तर महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी निर्मिती केली आहे. करून गेलो गाव नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग 7 एप्रिलला दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे होणार आहे.