मुंबई, 17 डिसेंबर : अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. 12 डिसेंबर रोजी ‘बेशरम रंग’ हे या चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे; मात्र या गाण्यातल्या वेशभूषेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही भाजप नेत्यांनी या गाण्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गाण्यातून दूषित मानसिकता दर्शवण्यात आली आहे. विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली आहे. या वादामध्ये तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ यांनीही उडी घेतली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘पठाण’ या चित्रपटातल्या वादग्रस्त गाण्याचे बोल ‘बेशरम रंग’ असे असून, या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने केशरी रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरून दीपिकावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर खासदार नुसरत जहाँ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांना “प्रत्येक गोष्टीत समस्या आहे,” असं त्या म्हणाल्या आहेत. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, नुसरत म्हणाल्या, ‘सत्तेत असलेल्या पक्षातल्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. त्यांना हिजाब घालणाऱ्या महिलांची अडचण आहे. त्यांना बिकिनी घालणाऱ्या महिलांची अडचण होत आहे. भारतातल्या नवीन पिढीतल्या मुली-महिलांनी काय परिधान करायचं हेदेखील याच पक्षातल्या व्यक्ती सांगत आहेत.’ हेही वाचा - Pathan Controversy : रक्तात हिंदू असेल तर…; पठाणच्या वादात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची उडी नुसरत जहाँ पुढे म्हणाल्या, “काय परिधान करावं, काय खावं, कसं बोलावं, कसं चालावं, शाळेत काय शिकलं पाहिजे, टीव्हीवर काय पाहिलं पाहिजे, याबाबत सांगून हे नेते आमच्या जीवनाला नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत विकसित होत आहे असं म्हणून दुसरीकडे ते नवीन पिढीवर नियंत्रण ठेवत आहेत. हे खूप भयानक आहे. ही परिस्थिती येत्या काळात आपल्याला कुठे घेऊन जाईल, याची मला भीती वाटत आहे.” ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते रिजू दत्ता यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भगव्या रंगाचे कपडे घालून स्मृती इराणी ‘फेमिना मिस इंडिया 1998’ स्पर्धेत रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. त्यानंतर ट्विटरवर ‘भगव्या’ रंगावरून भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. यातच नुसरत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आयटी-सेल प्रमुख अमित मालवीय यांनी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गेरुआ’ (केशर) गाणं गायल्याबद्दल गायक अरिजित सिंहचं कौतुक केलं होतं. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. मालवीय यांच्या ट्विटला प्रतिसाद म्हणून दत्ता यांनी इराणींचा व्हिडिओ पोस्ट केला.
दत्ता यांच्या ट्विटला उत्तर देताना, भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. अशा दुष्ट पुरुषाची पक्षाचा प्रवक्ता म्हणून नियुक्ती केल्याबद्दल ही टीका आहे. टीएमसी नेते महिलांचा आदर करत नाहीत, असा आरोपही चॅटर्जींनी केला आहे. दत्ता यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांच्या मते, चॅटर्जींना आंशिक अंधत्वाची समस्या आहे. “अरे! प्लीज हॅव अ लाईफ मॅडम…, भगवा हा तुमच्या पक्षाची संपत्ती आहे, असं वागणं थांबवा. दीपिका पदुकोणसारख्या इतर महिला जेव्हा भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं; पण जेव्हा स्मृती इराणी घालतात तेव्हा तुम्हाला आंशिक अंधत्व येतं. ढोंगी!!” असं ट्विट दत्ता यांनी केलं.