मुंबई, 7 जुलै : हिंदी सिनेमातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांना मागील काही महिन्यांपासून श्वासासंबंधी समस्या होत होत्या. ते मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अनेक नावांनी ओळखलं जाऊ लागलं. ट्रॅजेडी किंग, देशातील पहिले मेथड अॅक्टर अशी अनेक नावं मिळाली. परंतु त्यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होतं. चित्रपटांमध्ये आल्यानंतर त्यांचं खरं नाव बदललं आणि दिलीप कुमार ठेवलं. या नावामागेही एक कहाणी आहे.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दिलीप कुमार मुंबईत आपल्या वडिलांसोबत मोहम्मद सरवर खान यांच्यासोबत फळांच्या व्यवसायात मदत करत. एक दिवस वडिलांसोबत झालेल्या मतभेदानंतर ते मुंबईतून पुण्यात आले. इथे ब्रिटिश आर्मी कँटिनमध्ये नोकरी करू लागले. परंतु त्यांना स्वातंत्र्यांच्या समर्थनार्थ अटक करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परत आले. एक दिवस चर्चगेट स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना त्यांच्या ओळखीचे सायकोलॉजिस्ट डॉ. मसानी भेटले. ते 'बॉम्बे टॉकिज'च्या मालकीण देविका राणी यांना भेटायला निघाले होते. ते सोबत दिलीप कुमार यांनाही घेऊन गेले.
आपली आत्मकथा 'द सबस्टँस अँड द शॅडो' यात त्यांनी लिहिलंय, की त्यांना तिथे जायची इच्छा नव्हती, परंतु चित्रपटाचा स्टुडिओ पाहण्यासाठी ते गेले. देविका राणी यांच्या भेटीदरम्यान त्यांनी दिलीप कुमार यांना 1250 रुपयांच्या नोकरीचा प्रस्ताव दिला, तसंच अभिनेता बनण्याबाबतही विचारणा केली. 1250 रुपये पगार देण्याच्या आकर्षणाने त्यांना 'बॉम्बे टॉकिज'मध्ये अभिनेता करण्यात आलं. इथे त्यांचं ट्रेनिंग सुरू झालं.
देविका राणी यांनी त्यांना सांगितंल, की 'युसूफ तुम्हाला मी लवकरच अभिनेता म्हणून लाँच करू इच्छिते. त्यासाठी तुमचं स्क्रिन नेम बदलणं, ही कल्पना आहे. असं नाव ज्याने संपूर्ण जग तुम्हाला ओळखेल आणि प्रेक्षक तुमची रोमँटिक इमेज त्या नावाशी जोडू शकतील. दिलीप कुमार हे नाव चांगलं आहे.' परंतु देविका यांच्या नाव बदलण्याच्या विचाराशी ते सहमत नव्हते.
आपल्या आत्मकथेत त्यांनी लिहिलंय, असं नाव बदलणं गरजेचं आहे का? असा प्रश्न त्यांनी देविका यांना केला होता. त्यावर देविका यांनी दिलीपजींना चित्रपटांमध्ये तुमचं चांगलं भविष्य दिसत असल्याचं त्या म्हणाल्या. अशात स्क्रिन नेम चांगलं असल्यास एक सेक्यूलर अपील होईल, असंही त्यांनी सांगितलं. यावर विचार करुन त्यानंतर दिलीप कुमार नावासाठी ते सहमत झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dilip kumar