मुंबई, 7 ऑक्टोबर- हिंदी-मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला कडाडून विरोध केला जात आहे. चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून येत आहेत. या चित्रपटात सैफ अली खानने साकारलेल्या रावणावर प्रचंड आक्षेप घेतला जात आहे. यामध्ये आता राजकीय पक्षांनी उडी घेतलीआहे. काल भाजप आमदार राम कदम यांनी या चित्रपटाला विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला होता. तर दुसरीकडे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याउलट भूमिका घेत ‘आदिपुरुष’ला पाठींबा दर्शवला आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत. ‘आदिपुरुष’ चे दिग्दर्शक ओम रावतांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करत लिहलंय, ‘१)ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.परंतु आज त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या फक्त ट्रेलरवरुन वाद निर्माण होणं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. **(हे वाचा:** ‘Adipurush महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’; राम कदमांचा आक्रमक पवित्रा ) तसेच ओम राऊत यांच्या प्रामाणिक कार्याची आणि प्रयत्नांची प्रचिती आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर ओम राऊत हा अत्यंत हिंदुत्ववादी व्यक्ती असून त्याच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नसल्याची खात्रीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच राम कदम किंवा स्वतःला हिदूंत्ववादी म्हणणारे राजकीय नेते अवघ्या 95 सेकंदच्या टीजरवरुन चित्रपट कसा आहे? हे कसं काय ठरवू शकतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना ते ठरवू द्या असं मत त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केलं आहे.
१)ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 7, 2022
राम कदम यांची भूमिका- काल भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत लिहलं होतं, ‘आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यांनी फालतू लोकप्रियता मिळवण्यासाठी आमच्या देवी-देवतांचा अपमान केला आहे.
आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची’.