मुंबई, 14 सप्टेंबर- बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये मिलिंद सोमण यांची गणती केली जाते. वयाच्या 56 व्या वर्षीसुद्धा ते तरुण अभिनेत्यांना टक्कर देतात. मिलिंद सोमण सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येतात. सोबतच ते सतत मॅरेथॉनमध्ये धावतानाही दिसतात. पत्नी अंकिता कंवरसुद्धा नेहमी त्यांच्या सोबत असते. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक तरुण यांना फॉलो करतात. त्यामुळेच त्यांच्या खाजगी आयुष्यातील लहान-लहान घडामोडी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. नुकतंच त्यांच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लक्षवेधी जोडप्यानं मुंबईत एक नवं घर खरेदी केलं आहे. मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर आपल्या फिटनेसमुळेच नव्हे तर आपल्या लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असतात. मीडिया रिपोर्टनुसार, मिलिंद सोमण यांनी मुंबईत चार बेडरुमचं आलिशान फ्लॅट खरेदी केलं आहे. मिलिंद यांनी नुकतंच मुंबईतील प्रभादेवी परिसरात 4 बेडरुमचा फ्लॅट बुक केला आहे. दादर बीचजवळ स्थित असलेला सुमारे 1720 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि दोन पार्किंगची सोय असणारा हा आलिशान फ्लॅट आहे. मिलिंद सोमण यांचं नवीन घर फक्त आलिशानच नव्हे तर लोकेशननुसार खूप खास आहे. याठिकाणहून दादर बीच फार दूर नाही. तसेच जैन मंदिर आणि प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरही फार दूर नाही. याशिवाय दादर स्टेशन फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक राहुल थॉमस यांनी मिंटशी बोलताना सांगितलं की, प्रभादेवी परिसरात बांधलेलं हे अपार्टमेंट समुद्रापासून 100 मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. मिलिंद सोमण यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय’. **(हे वाचा-** Ramya Krishnan: ‘बाहुबली’ फेम शिवगामीने नेसली इतकी महागडी साडी; किंमत वाचूनच फुटेल घाम ) मिलिंद सोमण यांच्या कामाबाबत सांगायचं तर, ते लवकरच कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. यामध्ये कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मिलिंद सोमण सॅम मानेक शॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच त्यांचा फर्स्ट लुक समोर आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.