मुंबई, 15 ऑगस्ट : आज सगळ्या भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेलाही लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. चित्रपटसृष्टीत देखील स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता मिलिंद गवळी यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी या आठवणी सांगितल्या आहेत. मिलिंद यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून सैनिकांची भूमिका साकारली आहे. या भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता हे त्यांनी शेअर केले आहे. स्टार प्रवाहवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात नेहमी राहतात. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त नुकतंच मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, ‘‘नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दहावीनंतर summer camp समर कॅम्पला वडिलांनी मला भरती केलं, त्यात काही महिन्यांच्या training मुळे माझं आयुष्य बदलून गेलं आहे. सिनेमाचं आतोनात प्रेम असल्यामुळे कदाचित मी आर्मी किंव्हा पोलिस खात्यात गेलो नाही, पण आजही माझ्या रक्तामध्ये देशभक्ती कुटून कुटून भरलेली आहे.’ हेही वाचा - Independence Day : असे कलाकार ज्यांनी ‘या’ देशभक्तीपर भूमिका साकारून भारतीयांची मने जिंकली आहेत पुढे त्यांनी लिहिलंय कि, ‘‘ज्या वेळी मला सिनेमांमध्ये किंवा टेलिव्हिजनवर देश भक्ताचा, एका जवानाचा रोल करायला मिळाला तर मी कधीही मागेपुढे बघितलं नाही, लगेचच होकार दिला, जीव ओतून त्याला साकार करायचा प्रयत्न हि केला, मराठा बटालियन मधला आर्मी जवान “अमर भोसले " असो, दूरदर्शन वर मग “भगतसिंग " असो, किंवा “तू अशी जवळी रहा “या सीरिअल मधला रिटायर्ड “कर्नल अजय सावंत राव " असो, एकदा का ती वर्दी अंगावर घातली की रक्तारक्तात देशभक्ती भिंनतेच भिंनते.’’ अशा शब्दात त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. तसंच मिलिंद गवळी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘एक गोष्ट राहून गेलीये’ असं म्हणत एक खणत व्यक्त केली आहे. त्यांनी ‘आपल्या भारतातल्या प्रत्येक मुलाला सैनीकी शिक्षण अनिवार्य करायला हवं, त्याशिवाय काही गत्यंतर नाही’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.