मुंबई, 29 जुलै: राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी प्लानेट मराठीची नवी कोरी वेब सिरीज ‘मी पुन्हा येईन’ अखेर आज प्रदर्शित झाली आहे. वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांआधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा पासूनच वेब सीरिजबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. वेब सीरिजच्या नावानेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. अखेर आजपासून प्लानेट मराठीवर ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या भुकंपानंतर एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा जबरदस्त क्लायमॅक्स राज्यातील जनतेला पाहायला मिळाला. मात्र सत्तानाट्याचा हाच खेळ महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या प्लानेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. अरविंद जगताप यांनी मी पुन्हा येईन या वेब सीरिजचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. सध्या ‘मी पुन्हा येईन’चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची कुरघोडी, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मी पुन्हा येईल या वेब सीरिजमध्ये विनोदवीर भारत गणेशपुरे प्रमुख भूमिकेत आहे. मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणताना भारत गणेशपुरे ट्रेलरमध्ये दिसला. वेब सीरिजमध्ये भारत गणेशपुरे सह उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिघांमधील खडागंजी सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Supriya Sule In Bus bai Bus: घरात स्वयंपाक करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर, म्हणाल्या… त्याचप्रमाणे सीरिजमध्ये सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. वेब सीरिजविषयी सांगताना दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील’. तर प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटलंय, ‘विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच’.