मुंबई, 24 जुलै : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 100 हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या73व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केलं. 100 हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. हेही वाचा - रविंद्र महाजनी यांचा ‘हा’ सिनेमा ठरला शेवटचा, बाप लेकानं केलं होतं एकत्र काम “अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले होते. काल संध्याकाळी त्यांची तब्येत खालावली. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांच्या मुलीचा रात्री फोन आला की, त्यांची तब्येत खालावलीये. आम्ही डॉक्टरांशी बोलून सकाळी 10 वाजता निर्णय घेणार आहोत. पण त्यानंतर त्यांचे हार्टबीट्स पुन्हा सुरू झाल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं”, अशी माहिती अभिनेते जयवंत वाडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
“मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या हे एकदम फिट होते. ते नेहमी पॉझिटिव्ह होते. मानसिकरित्या ते अतिशय खणखर होते. तो दररोज व्यायाम करायचे. ते आज आपल्यात नाही ही फार दु:खाची गोष्ट आहे. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिलेले आहेत. छान काम करा असं ते नेहमी आम्हाला सांगायचे. माणसाने शारिरीकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट असायला हवं असं ते सांगायचे. अतिशन अभ्यासपूर्ण काम ते करायचे. मन लावून काम करायचे”, अशी प्रतिक्रिया मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.