मुंबई 27 मे: मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या अनेक अभिनेत्रीचं करिअर हे मालिकांमधून (Marathi Actresses Career) सुरू झालं आहे. नाटक आणि विशेषतः एकांकिकांमधून सुरुवात केल्यानंतर मालिकेत पदार्पण करत आज अनेक अभिनेत्रींनी यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे. मालिकेत काम करणं ही खायची गोष्ट नव्हे. महिन्यातले जवळपास 20-25 दिवस आणि अनेक वर्ष नेटाने तीच भूमिका करणं हे अवघड काम आहे. आत्ताच्या काळात बऱ्याच प्रमाणात मालिका या सुटसुटीत आणि कमी एपिसोडमध्ये गुंफलेल्या असतात. प्रेक्षकांना रटाळ आणि कंटाळवाणं वाटू नये अशाच कथानकांना आणि कमी एपिसोड्सच्या लवकर संपणाऱ्या कथानकांना आज मागणी आहे. मात्र किमान दहा वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. मालिका या 12-15 वर्ष सुद्धा आरामात चालत असल्याने त्याला कमिटमेंट देणं जोखमीचं होतं. मराठीमधील टॉपला असणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी अशीच मालिकेतून सुरवात केली आहे. अशाच काही अभिनेत्री आणि त्यांनी काम केलेल्या मालिकांबद्दल जाणून घेऊया.
- सई ताम्हणकर मराठीतील बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) करिअरची सुरवात डेलीसोप्स पासून झाली. इ-टीव्ही मराठी या चॅनेलवरील ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून सई ताम्हणकर घराघरात पोहोचली होती. ही मालिका अनेक वर्ष सातत्याने चालू होती आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सईने यानंतर झी मराठीवरील अनुबंध मालिकेत सुद्धा काम केलं तसंच तिने फु बाई फु च्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचलनसुद्धा केलं. आत्ता सईच्या झोळीत बॉक्स ऑफिसवरच्या अनेक सुपरहिट चित्रपटांसह प्रेक्षकांचं भरघोस प्रेमसुद्धा आहे. फक्त मराठीच नाही तर सईचं नाव बॉलिवूडमध्ये सुद्धा गणलं जातं.
- मृण्मयी देशपांडे मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली ती झी मराठीवरील कुंकू या मालिकेमुळे. तिचं जानकी हे पात्र प्रचंड गाजलं होतं. एका तरुण वयातील मुलीचं लग्न वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या माणसाशी होतं अश्या कथानकाची ही मालिका होती. मृण्मयी देशपांडे ‘अग्निहोत्र’ मालिकेतून सुद्धा दिसली होती आणि ती मालिका प्रचंड गाजली सुद्धा होती. मृण्मयी सध्या आपल्या अभिनयाच्या बळावर आपलं वेगळं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दमयंती देशमानेच्या भूमिकेत दिसली होती. हे ही वाचा- धक्कादायक! अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच,आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचं निधन
- संस्कृती बालगुडे संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. संस्कृतीच्या करिअरची सुरवात ‘पिंजरा’ या मालिकेतून झाली होती. तिला या मालिकेतील ‘आनंदी’ या पात्रामुळे बरीच लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका सुद्धा नृत्यांगनेच्या आयुष्यावर आधारित होती. संस्कृती सध्या एक आघाडीची अभिनेत्री आहे.
- प्रिया बापट प्रिया बापट (Priya Bapat) हे नाव घराघरात पोहोचण्याचं कारण होतं झी मराठीवरील मालिका. प्रिया प्रेक्षकांना दामिनी, अधुरी एक कहाणी, आभाळमाया या मालिकेतून भेटली होती. शिवाय ‘शुभमकरोति’ या मालिकेतील तिचं किमया हे पात्र बरंच गाजलं. आज प्रियाकडे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘आणि काय हवं’ अश्या वेबसिरीज आणि असंख्य चित्रपटांचं यश आहे.