मुंबई 16 जून : सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचं सोशल मीडिया विशेषतः Instagram अकाउंट चेक करत असाल तर तो किती चांगला फोटोग्राफर आहे, हेसुद्धा लक्षात येईल. सिद्धार्थने त्याच्या मुंबईच्या घराबाहेर आलेल्या एका पाहुण्याचा एक फोटो काल शेअर करा आणि राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईच्या गोरेगाव (Goregaon) भागात सिद्धार्थ राहतो. नॅशनल पार्कच्या जवळचा हा परिसर. एरवी गर्द हिरव्या झाडी आणि डोंगराच्या सान्निध्यामुळे हेवा वाटावा असा सुंदर. भर मुंबईत हे एकच काय ते जंगल शिल्लक आहे, तिथल्या जंगली प्राण्यांसह... हो! सिद्धार्थने त्याबद्दलच लिहिलं आहे.
अचानक त्याच्या खिडकीबाहेर त्याला चक्क बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे त्याच्यासह सगळेच अचंबित झाले. इमारतीतले अनेक लोक फोटो काढत होते. गोरेगाव भागात बिबट्याचा संचार गेले काही दिवस सुरू आहेच. पण एरवी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात रात्री येणारा हा पाहुणा त्या दिवशी दुपारीच दिसला.
बिबट्या चक्क सिद्धार्थच्याच घरासमोर दिसला. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टला त्याने अर्थपूर्ण कॅप्शनही दिलं आहे.
पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.’
सिद्धार्थने यापूर्वीही जंगली जनावरांचे फोटो टिपले आहेत. त्याला सांबर दिसलं आणि त्याचाही सुंदर फोटो त्याने पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे, ‘पिंजऱ्यात मी होतो. अडकलेलो. तो मोकळा फिरत होता सगळीकडे......अजून एक..’
तर त्यानंतर त्याला एक सरडाही एका झाडावर दिसला. त्याचाही फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे, ‘फोटोग्राफी कौशल्य चांगलं झालं आता. तो एक चांगला पोझर होता. धन्यवाद सरड्या.’ अशा मिश्कील अंदाजात त्याने म्हटलं आहे.
यानंतर अनेकांनी सिद्धार्थच्या या पोस्ट्सवर कमेंट्स केल्या आहेत. तर त्याच्या या पोस्ट्ससाठी कौतुकही केलं आहे. दरम्यान गोरेगाव भागात बहुतांश जंगल असल्याने या ठिकाणी सर्रास प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. तर आता पावसाचे दिवस असल्याने हे प्रामाणावर मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.