मुंबई, 30 जानेवारी : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी आपल्या बिनधास्त आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. विविध विषयावर ते आपलं म्हणणं अगदी मोकळेपणाने मांडत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख आहे. हृषिकेश जोशी यांचा राजकीय आणि सामाजिक दांडगा व्यासंग सर्वश्रुत आहे. सद्य परिस्थितीवर ते अगदी सहजपणे भाष्य करतात. आता अभिनेते हृषिकेश जोशी असाच एक आगळा वेगळा प्रयोग घेऊन चाहत्यांचा भेटीला येणार आहेत. यामधून ते महाराष्ट्रातील राजकारणावर प्रकाश टाकताना दिसून येणार आहेत. हृषिकेश जोशी यांच्यात सद्य परिस्थितीवर नेमकी टिप्पणी करण्याची ताकत आहे. असंच एक सत्य मांडत, ‘येतोय तो खातोय’ असं हृषिकेश जोशी सध्या सांगतायेत. ते असं का म्हणतायेत? तर त्याचं कारण आहे त्यांचं येणार नाटक. हृषिकेश जोशी लवकरच नवं नाटक घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ‘येतोय तो खातोय’ असं या नव्या नाटकाचं नाव आहे. विजय कुवळेकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी करणार आहेत. हेही वाचा - Sandeep Pathak: संदीप पाठकचा दिलदारपणा पाहून आजीच्याही डोळ्यात तरळले अश्रू; पाहा अभिनेत्यानं काय केलं ‘येतोय तो खातोय’ हे एक आगळं वेगळं नाटक समाजातील महत्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. या नाटकात लोकनाट्य संगीताचा वापर करण्यात येणार आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातूनही 6 दमदार गाण्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करण्यात येणार आहे. राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार घेताना गोष्टीच्या माध्यमातून राजकीय हेवेदावे गमतीशीर व तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार लेखक विजय कुवळेकर यांनी या नाटकातून केला आहे.
आता ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून विजय कुवळेकर यांनी सद्य राजकीय चित्र मांडले आहे. पॉलिटिकल सटायर असलेल्या या नाटकातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. या नाटकाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी सांगतात की, ‘सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून मनोरंजनाच्या माध्यमातून ‘राजकीय पोलखोल’ केली जाणार आहे’. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे.
हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले,अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर हे कलाकार ‘येतोय तो खातोय’ नाटकात आहेत. नाटकाचे संगीत अजित परब यांचे तर नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. या नाटकात तगडे कलाकार आहे. आता हृषिकेश जोशी नेमकं काय घेऊन येणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.