मुंबई 27 जून: अभिनेता म्हणून ख्याती असणाऱ्या आणि एका सुपरहिट सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळलेल्या मंगेश देसाई (Mangesh Desai birthday) यांचा आज वाढदिवस आहे. मंगेश आज त्यांच्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहेत. 2006 मध्ये आपल्या करिअरची सुरवात केलेल्या मंगेश यांना आज सगळे ‘क्राईम पॅट्रोल’ मालिकेमुळे ओळखतात. पण त्यांची खरी ओळख सध्या आनंद दिघे या थोर व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाचे निर्माते म्हणून आहे. सध्याच्या राजकीय धुमाळीत या चित्रपटाचं नाव अनेकदा घेतलं जात आहे. तुम्हाला माहित आहे का मंगेश देसाई आणि मा. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं एक खास नातं आहे. सध्या धर्मवीर सिनेमाची तुफान चर्चा सगळीकडे होत आहे. हा चित्रपट स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यात मंगेश यांनी एका पत्रकाराची छोटीशी भूमिका तर साकारली आहेच शिवाय या सिनेमाचे निर्माते म्हणून सुद्धा त्यांचं नाव जोडलं गेलं आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या वेळी एका मुलाखतीत मंगेश देसाईंनी या सिनेमाच्या मागचे अनेक किस्से आणि आठवणी शेअर केल्या होत्या. दैनिक बोंबाबोंब या पोर्टलला माहिती देताना ते असं सांगतात की, “आनंद दिघे यांच्यावर सिनेमा करू असं गेले अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं पण त्याला हवा तास मुहूर्त लागत नव्हता. 2013 मध्ये मला आणि माझ्या जवळच्या अनेकांना वाटलं की दिघे साहेबांवर आधारित चित्रपट करावा. त्यावर 2014 2017 2019 अशी लागोपाठ तीन वर्ष काम करायचा प्रयत्न झाला पण तो योग्य येत नव्हता. जो योगायोगाने प्रवीण तरडे सोबत एका छोट्याशा बोलण्यातून जमून आला. आणि प्रवीण यांनी सुद्धा शंभर टक्के काम करायचं आश्वासन दिलं. दिघे साहेबांबद्दल आमच्याकडे चित्रपट करायचा शंभर टक्के आत्मविश्वास होता पण शंभर टक्के माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांची सावली म्हणून राहिलेल्या मा. एकनाथ शिंदे यांना मी गाठलं. ते सुद्धा अनेकदा या चित्रपटाबद्दल विचारणा करायचे. त्यांनी मला सांगितलं की तुला विश्वास आहे ना तू बिनधास्त पुढे जा कामाला लाग, तुला जी मदत लागेल मी हवी ती मदत करेन. माझे शिंदे साहेबांशी मैत्रीचे संबंध आहेत.
त्यांना मी शंभर टक्के माहिती देण्याबद्दल विचारणा केली. त्यांनी मला निर्माता हो असं सांगितल्यावर अडचणी आल्या तर त्यांचा सहभाग असावा असं सुद्धा मी त्यांना म्हणलो. आणि त्यांनी निर्मिती करताना भक्कमपणे पाठीशी उभं राहत साथ दिली. जसं दिघे साहेबांकडे एखादा माणूस अडचण घेऊन गेला तर ते सहज अडचण सोडवायला होकार द्यायचे तसंच शिंदे साहेबांचं सुद्धा आहे.” हे ही वाचा- Manava Naik: मनवा नाईकचा छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेत महत्त्वाची भूमिका! मंगेश यांनी या चित्रपटाचा सेट ठाण्यातच उभा केला होता. त्यांनी या चित्रपटातून अक्षरशः दिघे साहेबांचा इतिहास जिवंत केला असं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. मंगेश यांचा जन्म औरंगाबादचा असून सध्या ते ठाण्यात राहतात. त्यांनी अभिनय क्षेत्रात यशस्वी नाव कमावलं आहे. मंगेश यांनी प्रेक्षकांनी फु बाई फु या धमाल कॉमेडी मालिकेत पाहिलं होतं तसंच त्यांना तडफदार पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत सध्या क्राईम पॅट्रोल मालिकेत लोक पसंत करत आहेत. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेत लाल बत्ती नावाचा चित्रपट सुद्धा केला आहे. मंगेश येत्या काळात धर्मवीरच्या दुसऱ्या भागात सुद्धा निर्माते म्हणून समोर येतात का हे पाहून महत्त्वाचं असेल.