मुंबई, 15 ऑगस्ट : झी मराठीवरील माझा होशील ना हि मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेचा वेगळा विषय आणि सई आणि आदित्य यांची क्युट लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडली होती. मुख्यतः सई आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. अजूनही सोशल मीडियावर सई आणि आदित्यचे फॅनक्लब्स आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी या दोघांनी सई - आदित्यची भूमिका गाजवली होती. आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. सगळ्यांचे लाडके सई - आदित्य लवकरच पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. एका आगळ्यावेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे दोघे प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते दोघे नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता गौतमी आणि विराजस पुन्हा एकत्र येणार असल्याची माहिती या दोघांनी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. सई आणि आदित्यची हि जोडी लवकरच ‘पारिजात’ या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पारिजात’ बद्दल अजून काही माहिती समोर आली नसली तरी हा म्युझिक व्हिडीओ लवकरच युट्युबवर प्रसारित होणार आहे. प्रसिद्ध गायक ह्रिषीकेश रानडे आणि अमित गुजर हे दोघे गायक असून त्यात विराजस आणि गौतमी दिसणार आहेत. ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेही वाचा - Pippa Teaser Out: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दमदार टीझर प्रदर्शित विराजस सध्या ‘माझा होशील ना’ मालिका संपून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि BTS व्हिडीओ आणि त्यामागील किस्से चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे. त्याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता चाहत्यांची लाडकी सई आदित्यची पुन्हा पाहायला मिळणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळेसोबत लग्न झाल्यापासून कायम चर्चेत असतो. तर गौतमी आणि मृण्मयी देशपांडे यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.