मुंबई, 18 जानेवारी: दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन येत आहेत. शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येणाऱ्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आता या सिनेमाविषयी अजून एक विशेष घोषणा शिंदे यांनी केली आहे. केदार शिंदे यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास कसा होता त्याचा उलगडा केला आहे. हा चित्रपट केदार शिंदे यांच्यासाठी खूपच खास आहे. या चित्रपटाविषयी सांगताना त्यांनी लिहिलं आहे कि, ‘एका सिनेमासाठी ३ वर्ष तयारी करताना काळ किती भरभर निघून जातो हे कळतच नाही.. कालचीच गोष्ट वाटते जेव्हा ही कल्पना डोक्यात आली.. आता आतच तर स्क्रिप्ट वर काम सुरू होतं.. लोकेशन शोधायला फिरलो त्याची माती अजूनही बुटांवर आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक देवळांची दर्शनं घेतली त्याची फुलं सुद्धा सुकली नसतील..’ हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धचा डाव फसणार; अरुंधतीच्या आयुष्याची होणार नवी सुरुवात ते पुढे म्हणतात कि, ’ हे सगळं शक्य झालं ते दोन गोष्टींमुळे - १) शाहीर साबळे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे बाबा, ह्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यावर असलेलं प्रेम आणि २) तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार आणि उत्तम देण्याची असलेली इच्छा.. ह्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आलेला आहे.. एक बहुआयामी कलावंत असणाऱ्या शाहिरांचा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ पडद्यावर येण्यासाठी अजून फक्त १०० दिवस बाकी आहेत.. भेटू लवकरच.. फक्त सिनेमागृहात!!’
आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी केवळ शंभर दिवस शिल्लक राहिले आहेत. अशी घोषणा केदार शिंदे यांनी केली आहे. हे ऐकून प्रेक्षकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय कि, ‘आतुरता.. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट येतोय..’, ‘वाट पाहतोय’ असं म्हणत काहींनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करणार असल्याचा उलगडा झाला. अंकुशचा एक खास लुक देखील समोर आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमात शाहिरांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’. शाहीरांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात भक्कम साथ असणाऱ्या त्यांच्या पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची भूमिका त्यांचीच पणती म्हणजे सना शिंदे साकारणार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.