मुंबई, 3 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन येत आहेत. शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येणाऱ्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. आता या सिनेमाविषयी एक विशेष शिंदे यांनी केली आहे. ती म्हणजे त्यांची लेक सना शिंदे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करणार असल्याचा उलगडा झाला. अंकुशचा एक खास लुक देखील समोर आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटातील अजून एका महत्वाच्या व्यक्तिरेखेची भूमिका सना साकारणार आहे. हि व्यक्ती म्हणजे शाहिरांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’. शाहीरांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात भक्कम साथ असणाऱ्या त्यांच्या पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची भूमिका त्यांचीच पणती म्हणजे सना शिंदे साकारणार आहे. केदार शिंदे यांनी नुकतीच एक पोस्ट शेयर करून याचा उलगडा केला आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे कि, ‘‘आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं….सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती.’’ हेही वाचा - Mayuri deshmukh : पतीच्या आत्महत्येनं खचली पण पुन्हा जोरदार कमबॅक; मयूरीबद्दल या गोष्टी माहितीयेत का? नुकतीच केदार शिंदेनी लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिच्या अभिनयक्षेत्रातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ‘‘माझे आजोबा आणि तुझे पणजोबा “शाहीर साबळे” यांनी नेहमीच सर्वोत्तम काम करून रसिकांच्या मनात घर केलं.. मी तोच प्रयत्न करतो आहे.. तू सुद्धा त्याच दिंडीत वारकरी म्हणून सहभागी होते आहेस..तुला खुप शुभेच्छा…’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आता आज सना शिंदेला या भूमिकेत पाहून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.