मुंबई, 27 नोव्हेंबर : मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांसोबत फसवणुकीच्या घटना घडत असतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आणखी एका कलाकारासोबत अशीच काहीशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. 'महाभारत' फेम अभिनेते पुनीत इस्सारसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. अभिनेता फसवणुकीचा बळी ठरला आहे.
पुनीत इस्सार यांचे ईमेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीने अभिनेत्याचे ईमेल अकाउंट हॅक करून 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. आज तकच्या वृत्तानुसार, दक्षिण मुंबई परिसरात पुनीत इस्सार यांचा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु आरोपीने प्रथम अभिनेत्याचा ईमेल हॅक केला. यानंतर शोच्या बुकिंगचे 13.76 लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. पुनीत इस्सर मंगळवारी त्यांचा ईमेल अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा - प्रसिद्ध अभिनेत्री आणि ऑस्कर विजेत्या गायिकेचं निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुनीत इस्सर यांनी त्यांच्या जय श्री राम या हिंदी नाटकासाठी एनसीपीए थिएटर बुक केले होते. यासाठी त्यांना 13,76,400 रुपये देण्यात आले. पुनीत हे नाटक 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी सादर करणार होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या थिएटर प्रोडक्शन कंपनीच्या मेल आयडीवरून बुकिंग केले होते. 22 नोव्हेंबर रोजी पुनीत इस्सार यांनी एनसीपीएला मेल करण्यासाठी त्यांचा मेल आयडी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेल आयडी उघडला नाही. यानंतर अभिनेते पुनीत यांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एखाद्या अभिनेत्याची फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अन्नू कपूरसह इतर अनेक स्टार्सही ऑनलाइन फसवणुकीत अडकले आहेत. पुनीत इस्सार हे महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. ते बिग बॉसमध्येही झळकले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Gmail, Online fraud, Tv actor