मुंबई 18 जुलै: आपल्या सुंदर आवाजासाठी ओळखले जाणारे जेष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं निधन (singer bhupinder singh passes away) झाल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी या बातमीची पुष्टी दिल्याचं समोर येत आहे. बॉलिवूडमध्ये एक भारदस्त आवाज अशी त्यांची ओळख होती. आणि विशेष म्हणजे गझल गाण्यात सुद्धा त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने सांगीतक्षेत्रात शोककळा पसरल्याचं समोर येत आहे. काय आहे निधानाचं कारण? भूपिंदर सिंह गेले अनेक दिवस शरीराच्या विविध व्याधींनी ग्रस्त होते अशी माहिती मिळत आहे. त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात दाखल सुद्धा केलं गेलं होतं. त्यांच्या अंतिम कार्याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नसली तरी या बातमीने चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
Veteran singer Bhupinder Singh dies at Mumbai hospital, says wife Mithali Singh
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2022
वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या भूपिंदर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांचा आवाज आहे. सत्ते पे सत्ता, दूरिया, अहिस्ता अहिस्ता अशा अनेक चित्रपटांना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांपैकी एका गाण्याच्या ओळी सध्या चाहत्यांना लक्षात येत आहेत. होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा या गाण्याच्या ओळींची आठवण चाहते काढताना दिसत आहेत. एकेकाळी संगीताची आवड नसलेल्या भूपिंदर यांनी वडिलांकडून सुरुवातीच्या काळात संगीत कलेचं शिक्षण घेतलं. मन्ना डे, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्ग्ज गायकांसोबत गाणं गायची संधी भूपिंदर यांना लाभली होती. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 मध्ये पंजाबमधील अमृतसर इथे झाला होता. त्यांचे वडील सुद्धा संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. गुलजार यांनी लिहिलेल्या वो जो शहर था या गाण्याने त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं. त्यांचं मिताली मुखर्जी यांच्याशी 1980 साली लग्न झालं होतं. हे वर्ष संगीत क्षेत्रासाठी बरंच दुःखद असल्याचं समोर येत आहे. अजून अर्ध वर्ष सरलं असं म्हणेपर्यंत चाहत्यांनी डोक्यावर घेतलेले संगीत क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहरे काळाच्या पडद्याआड गेल्याचं दिसून आलं आहे. भारताचा लाडका आवाज लता मंगेशकर, प्रसिद्ध गायक केके अशी अनेक दिग्ग्ज मंडळी सोडून गेल्याचं दुःख चाहत्यांना आजही आहे. भूपिंदर यांच्या जाण्याने सुद्धा चाहत्यांवर मोठी शोककळा पसरल्याचं चित्र दिसत आहे. आपल्या लाडक्या गायकाला आदरांजली वाहत चाहते ट्विट करताना दिसून येत आहेत.