मुंबई 26 जुलै: मराठी सिनेमा सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करताना दिसत आहे. रोमान्स, ऍक्शन, कॉमेडी अशा अनेक विभागांमध्ये अनेक सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. येत्या काळात प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा नव्या सिनेमात भेटीला येत असल्याचं समोर आलं आहे. चि व चि.सौ.का सिनेमामध्ये झळकलेली ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले (lalit prabhakar & mrinmayee godbole new movie) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘तो ती आणि फुजी’ नावाच्या लव्हस्टोरीमध्ये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळणार आहे. ललितने स्वतः एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चि व चि.सौ.का सिनेमाला मिळालेल्या यशानंतर या जोडीला पुन्हा एकत्र बघायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या सिनेमाचं कथानक जपानमध्ये घडणार असून शूटिंग पुणे, टोकियो आणि जपानमधील इतर शहरात होणार आहे. इरावती कर्णिक या लेखिकेने सिनेमाचं लिखाण केलं असून नुकत्याच रिलीज झालेल्या मिडीयम स्पायसी सिनेमाचा दिग्दर्शक मोहित टाकळकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. सिनेमाचं चित्रीकरण येत्या सप्टेंबर महिन्यात सुरु होईल असं सुद्धा पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ललित आणि मोहित ही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने मिडीयम स्पायसी सिनेमानंतर पुन्हा एकत्र काम करणार आहे. तर मृण्मयी आणि ललित सुद्धा एका गोड लव्हस्टोरीतून दिसून येणार असल्याने या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता बघायला मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जपानमधील शहरं सुद्धा बघायला मिळणार असल्याने त्याची सुद्धा वेगळी उत्सुकता दिसून येत आहे.
या सिनेमाची टीम अनेक मातब्बर मंडळींनी परिपूर्ण आहे. इरावती कर्णिक या लेखिकेने झिम्मा सिनेमाचं सुद्धा लेख केलं होतं. या सिनेमाच्या घवघवीत यशानंतर ती नवं कथानक घेऊन भेटीला येणार आहे. हे ही वाचा- Hemangi Kavi: ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; लिहिली खास पोस्ट तर ललितचे मागचे दोन्ही प्रोजेक्ट मिडीयम स्पायसी आणि पेटपुराण हे प्रेक्षकांच्या बरेच पसंतीस पडले होते. सध्या या नव्याकोऱ्या सिनेमाच्या घोषणेनंतर ललित-मृण्मयी या जोडीला पुन्हा बघायला चाहते उत्सुक झाले आहेत. अनेकांनी ललिताच्या पोस्टवर कमेंट करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.