मुंबई, 22 मार्च- दादर रेल्वे स्टेशनवर हमालीचं काम करणाऱ्या व्यक्तीनं स्टेशनवर सापडलेला तब्बल दीड लाख रुपयांचा मोबाईल हा पोलिसांच्या मदतीनं मोबाईल मालकाला परत केलाय. दशरथ दौंड (वय 62) असं या हमालाचं नाव असून त्यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, दौंड यांना ज्याचा मोबाईल सापडला होता, ती व्यक्ती बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे विश्वासू मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे होते.
दशरथ दौंड हे दादर स्टेशनवर गेल्या तीन दशकांपासून हमाल म्हणून काम करत आहेत. त्यांचे उत्पन्न दिवसाला 300 रुपयांपेक्षा जास्त नाही. मात्र, सोमवारी (20 मार्च 2023) त्यांच्यासोबत जी घटना घडली, त्यानंतर त्यांच्या प्रामाणिकपणाचं खूपच कौतुक होत आहे. दौंड यांना सोमवारी रेल्वे स्टेशनवर बसण्यासाठी असणाऱ्या जागेजवळ एक हाय-एंड मोबाईल दिसला.
(हे वाचा:Bageshwar Dham: आता उलगडणार चमत्कारिक रहस्ये; 'बागेश्वर धाम'वर बनणार सिनेमा,पाडव्याला मोठी घोषणा)
त्यांनी हा मोबाईल उचलला, व तो रेल्वे पोलिसांकडे जमा केला. पोलीस अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, तो मोबाईल चक्क अमिताभ बच्चन यांचे विश्वासू मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांचा असल्याचं समोर आलं. या मोबाईलची किंमतसुद्धा तब्बल 1.4 लाख रुपये होती. पोलिसांनी हा मोबाईल सावंत यांना परत केला. त्याचवेळी, दौंड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सावंत कुटुंबियांनी त्यांना एक हजार रुपयांचं बक्षीस दिलं.
नेमकं काय घडलं?
दशरथ दौंड हे सोमवारी नेहमीप्रमाणे दादर रेल्वे स्टेशनवर कामावर गेले होते. रात्री 11. 40 च्या सुमारास दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून अमृतसरला एक ट्रेन जात होती. त्याचवेळी दौंड यांना मोबाईल सापडला. याबाबत ते म्हणाले, ‘मी प्लॅटफॉर्मवर चालत होतो, तेव्हा मला बसण्यासाठी असणाऱ्या जागेवर एक फोन पडलेला दिसला. मी तो उचलला आणि तिथे जवळ बसलेल्या प्रवाशांकडे फोनबाबत विचारपूस केली.
परंतु तिथे बसलेल्यांपैकी कोणाचाही फोन नसल्यानं मी तो रेल्वे पोलिसांकडे जमा केला, व त्यांना सांगितलं की, मला फोनमधील फार काही कळत नाही. मला सापडलेला फोन हा ज्याचा आहे त्याला परत करा.’ मोबाईल पोलिसांकडे जमा केल्यानंतर दौंड तिथून गेले. त्यानंतर काही वेळानं पोलिसांनी पुन्हा दौंड यांना बोलावून घेतले, व मोबाईलचा मालक सापडला असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दररोज तीनशे रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असताना दौंड यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला आहे, त्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Entertainment, Mumbai News