मुंबई, 02 मे : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. प्रेक्षकही वेळोवेळी मराठी सिनेमांना भरघोस प्रतिसाद देताना दिसून येतात. नुकतेच असेच दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एकीकडे बहुचर्चित केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांचा TDM हा सिनेमा 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. दोन्ही सिनेमांची प्रदर्शनाआधी चांगलीच चर्चा होती. पण सध्या TDM या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रीन मिळत नसल्याची माहिती समोर आली होती. यामुळे मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता याच प्रकारावर बिग बॉस फेम किरण माने यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करत मराठी सिनेमांच्या दीनवाण्या स्थितीवर भाष्य केलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘अस्सल मराठी मातीतल्या TDM ला शोज मिळत नाहीत. मराठी मातीचा दरवळ देशभर पसरवणाऱ्या शाहिरांना सलाम करण्यासाठी आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ला शोज आहेत पण प्रेक्षक नाहीत. यावेळी खऱ्या अर्थानं मराठी ‘दीन’ झाली आहे…’ अशा भावना किरण माने यांनी व्यक्त केल्या आहेत.
किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. या पोस्टखाली कमेंट करत काही जणांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चे शो हाऊसफुल्ल चालू असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी एकाच दिवशी दोन सिनेमे प्रदर्शित केल्याने ही वेळ आली असं म्हटलं आहे. तर काही जणांनी त्यांनाही चित्रपटगृहात TDM पाहायला गेल्यावर हा शो नाही असं उत्तर मिळाल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी आपण हिंदी चित्रपटांना अधिक महत्व देतो त्यामुळे मराठी सिनेमा संपत असल्याचं म्हटलं आहे. Nawazuddin Siddiqui: ‘माझ्या आयुष्यात रोमान्स नाहीच…’ वैयक्तिक आयुष्याबद्दल नवाजुद्दीनने व्यक्त केली नाराजी TDM हा सिनेमा 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र सिनेमाला स्क्रिन्स न मिळाल्याने दिग्दर्शकांसह कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिनेमाच्या कलाकारांनी थेट थिएटरमध्ये जाऊन कलाकारांसमोर हात जोडून सिनेमा पाहण्याची विनंती केली होती. मेहनतीनं तयार केलेल्या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रिन्स न मिळाल्याने कलाकारांना अक्षरश: रडू कोसळलं. याचवेळी अजित पवार यांनी ट्विट करत TDM सिनेमाला स्क्रिन उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केलं होतं. आता याच प्रकारावर किरण मानेंनी देखील मत व्यक्त केलं आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुतेक ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल्ल होत आहे. तसेच या सिनेमाचे चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता किरण मानेंच्या या पोस्टमुळे मराठी सिनेमाची चित्रपटगृहात होणारी दुरावस्था हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.