मुंबई, 16 ऑगस्ट : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्यांनी साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुलगी झाली हो या मालिकेतुन काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. तेव्हा अनेक कलाकारांनी माने यांना पाठींबा दिला होता. त्यात अनिता दाते हिचाही समावेश होतो. आता एवढ्या दिवसांनी पुन्हा किरण माने यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी अभिनेत्री अनिता दाते हिचे आभार मानले आहेत. अभिनेत्री अनिता दाते नुकतीच झी मराठीवरील बस बाई बस या शो मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने किरण माने यांना पाठींबा का दिला होता याचे स्पष्टीकरण दिले. त्याबद्दलच किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहीत तिचे तसेच झी मराठीचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलं आहे कि, ‘‘झी मराठी’, तुमचे लै लै लै आभार… सहा महिन्यांपूर्वी माझ्या ‘अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या’ विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आनि मांडायचं ‘स्वातंत्र्य’ सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल!’ हेही वाचा - Bhagya Dile Tu Mala : सानिया करणार का कावेरीला रत्नमालापासून दूर? एपिसोड अपडेट आला समोर त्यांनी पुढे खंत व्यक्त करत लिहिलं आहे कि, “मालिकेतून काढणार्यांकडंन मला अचानक का काढण्यात आलं, या प्रश्नांची उत्तरं आजही नाहीत. म्हणूनच आजही हे ‘विवेकी’ मुद्दे मांडून त्यावर ठाम असनारी अनिता दाते ही महत्त्वाची आहे. ते एडीट न करता दाखणाऱ्या झी वाहिनीनं या मुद्याला न्याय दिलाय. अनिता गेली पंधरा वर्ष मला ओळखतेय. ‘वाडा चिरेबंदी’, ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ या नाटकांत आम्ही एकत्र होतो. ‘माझ्या नवर्याची बायको’ मध्ये आम्हाला भाऊ-बहीण म्हणून महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यामुळं माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाही.”
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या शो मध्ये अभिनेत्री अनिता दाते-केळकरने, “व्यवस्था समजून घेणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीनं मांडता येणं ही खरंतर चांगली गोष्ट आहे असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचं कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणं हे चुकीचं आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो. मात्र त्याचं तोंड बंद करणं, त्याला धमकावणं, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचं लक्षण आहे.” अशा शब्दात भावना व्यक्त करत किरण मानेंना पाठींबा दर्शवला होता. दरम्यान किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.