मुंबई, 20 जून : आजही सोशल मीडिया सुरू केलं की रील्स सेक्शनमध्ये बहरला हा मधुमास नवा हे गाणं वाजताना दिसतं. महाराष्ट्र शाहीर या सिनेमातील हे गाणं आजही प्रेक्षक त्याच आवडीने पाहतात. केदार शिंदे दिग्दर्शिक या सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. केदार शिंदेंची मुलगी आणि शाहिरांची पणती सना शिंदे हिने या सिनेमातून पदार्पण केलं. पदार्पणातच तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिचं बहरला हा मधुमास नवा हे गाणं आणि त्या गाण्यातील हुक स्टेप प्रेक्षकांची चांगलीच डोक्यावर घेतली. सना म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदेची जीव की प्राण. लेकीच्या पदार्पणासाठी केदार शिंदेंनीही खूप मेहनत घेतली. केदार आणि सना या बाप-लेकीचं खास बॉन्डिंग आहे. नुकतीच केदार शिंदे यांनी लेकीच्या जन्माचा एक रंजक प्रसंग सांगितला. सनाचा जन्म झाल्यानंतर केदार शिंदेंच्या आयुष्यात खूप बदल झाले. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला. आपल्याला मुलं झालं तर ती मुलगी असावी असं त्यांना आधीपासूनच वाटत होतं. सना जन्माला आली तेव्हा नेमकं काय झालं हे सांगताना केदार शिंदे म्हणाले, “18 ऑक्टोबर 1998मध्ये सना माझ्या आयुष्यात आली. मला अजूनही तो प्रसंग आठवतो. माझ्या बायकोला लेबर रूममध्ये ठेवलं होतं आणि मी बाहेर बसलो होतो. काही वेळानंतर एका बाळाच्या रडण्याच्या आवाज आला. त्यानंतर काही वेळाने एक नर्स खूप गंभीर चेहऱ्याने बाहेर आली. ती आली आणि दुसऱ्या रूममध्ये गेली. मी तिला विचारलं काय झालं. ती काहीच बोलली नाही. असं 3 वेळा झाललं. मी तिला तिन्ही वेळा काय झालं विचारलं पण ती काहीच बोलली नाही”. हेही वाचा - सई ताम्हणकर एकटी नाही तर ‘या’ व्यक्तीसोबत फिरतेय स्पेन, इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट
केदार शिंदे पुढे म्हणाले, “नर्स काहीच बोलेना हे पाहून तेव्हा मी हळू हळू पॅनिक व्हायला लागलो. काय झालं असेल मला कळत नव्हतं. शेवटी मी त्या नर्सला दोन्ही हातांनी धरलं आणि काय झालंय काय? असं विचारलं. तेव्हा ती फार चेहरा पाडून म्हणाली की, “मुलगी झाली आहे”. हे ऐकून मी तिला तिथेच उचललं आणि गोल गोल फिरवलं. हे पाहून ती खूप बावचळली, चिडली आणि मला म्हणाली, “आहो तुम्हाला लाज वाटते की नाही?” मी तिला म्हटलं, “मला मुलगी झाली याचा आनंद आहे हा”. त्यावर ती मला म्हणाली, “अहो कसले बाप आहात तुम्ही. आज सकाळपासून मी तीन वेळा तीन जणांना सांगितलं तेव्ही ते मला मुलगी झाली म्हणून शिव्या देऊन गेले. तुम्ही पहिले असे बाप आहेत”.
“मला मुलगीच हवी होती. कदाचित मुलगा झाला असता तर माझ्या बायकोला बरेच चान्सेस घ्यावे लागले असते. आज इतक्या वर्षांनी सनाने महाराष्ट्र शाहीरमधून पदार्पण केलं. रसिक प्रेक्षकांनी तिच्या गाण्याला आणि अभिनयाला उत्तम प्रतिसाद दिला. मी तिला नेहमी सांगतो की तुझ्यातली विद्यार्थिनी जागी ठेव. तुला आणखी बरंच काही शिकायचं आहे. मला खात्री आहे की माझ्या आयुष्यात मुलगी आहे आणि मुलगी काही करू शकते”, असं केदार शिंदे पुढे म्हणाले.

)







