नवी दिल्ली, 21 मे : गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘धाकड’ (Dhaakad) चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. कंगनाचे फॅन्स तिच्या हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी कंगना राणौतचा 'धाकड' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट मोठा हिट ठरेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Dhaakad Box Office Collection) आपटला आहे असंच म्हणता येईल.
पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा पाहून क्वीन कंगनाही नक्कीच निराश झाली असावी. 'धाकड' चित्रपट पहिल्या दिवशीच कमाईचा दुहेरी आकडा गाठण्यास अपयशी ठरला. पहिल्याच दिवशी चित्रपट फ्लॉप झाला आहे.
कंगनाच्या 'धाकड'चं ओपनिंग कलेक्शन तिच्या करिअरमधील 'जजमेंटल है क्या' आणि 'पंगा' या शेवटच्या दोन फ्लॉप चित्रपटांपेक्षाही कमी आहे. या चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू (Mixed Review) मिळाले होते, त्यामुळे आणि स्पाय अॅक्शन चित्रपट असल्याने तो चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा होती. शिवाय बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2' शिवाय आणखी दुसरा मोठ्या बॅनरचा चित्रपट रिलीज झाला नव्हता, त्यामुळे त्याचाही फायदा ‘धाकड’ला होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु कंगनाच्या ‘धाकड’ला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. या संदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिलंय.
'धाकड' देशभरातील जवळपास 2200 सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. प्रमोशनच्या खर्चाचा समावेश केला, तर 'धाकड'चे एकूण बजेट 85 कोटी रुपयांच्या आसपास आहे, तसंच कंगनाने या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतल्याचीही माहिती मिळत आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता 'धाकड' बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपल्या हिरोईनची फीदेखील वसूल करू शकलेला नाही, इतकी कमी कमाई झाली आहे. दुसरीकडे, 'धाकड'सोबत रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) 'भूल भुलैया 2' ला बॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत या वर्षातील आतापर्यंतचं सर्वांत मोठं ओपनिंग मिळालं आहे.
धाकडची पहिल्या दिवसाची कमाई -
चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.20 कोटी रुपये कमवले आहेत. सकाळचे बहुतेक शो रिकामे होते, तर संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात प्रेक्षक चित्रपट पाहायला आले, त्यामुळे इतकी कमाई झाली, नाहीतर हा आकडा अजून कमी असता. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत होती. परंतु, इतकं प्रमोशन करूनही कंगनाच्या पदरात कमाईच्या बाबतीत निराशाच पडली आहे.
दुसरीकडे, कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ने पहिल्या दिवशी 14 कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय. कंगनाने धाकड चित्रपटात एजंट अग्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ताची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचं शूटिंग सारणी (पॉवर प्लांट), पंचमढी आणि भोपाळ इथे करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Kangana ranaut, Movie review