मुंबई, 04 मार्च: गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे तो चित्रपट म्हणजे सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule Jhund) ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट. आज (4 मार्च 22) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे; पण त्यापूर्वीच त्याची प्रचंड प्रसिद्धी झाली आहे. बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Jhund) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan reaction on Jhund), दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसह (Dhanush Reaction on Jhund) अनेकांनी कौतुक केलं आहे. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यानंही नागराज मंजुळेच्या या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत जितेंद्र जोशी याने या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीलाच त्यानं सांगितलं की, आमचा नागराज हिंदी चित्रपटामध्ये येतोय. याबद्दल हिंदी चित्रपटाचं अभिनंदन. त्याने या संपूर्ण लाइव्हमध्ये नागराज मंजुळे आणि त्याच्या टीमचं तोंडभरून कौतुक केलं आहे. हे वाचा- ‘‘झुंड’ एक मास्टरपीस’, मराठमोळ्या नागराज मंजुळेंचा चित्रपट पाहून धनुष भावुक या व्हिडीओत जितेंद्र जोशीच्या चेहऱ्यावर काहीतरी मार लागल्याच्या खुणा दिसत आहेत, त्याचाच संदर्भ देत त्यानं ‘झुंड’बद्दलचा धागा पुढे नेला. तो म्हणाला, ‘मी असा चेहरा घेऊन का आलो आहे, असं वाटेल. पण मी पडलो आणि मला लागलं. मी या खुणा लपवायला बघत होतो; पण मग मी विचार केला मी का लपवू चेहरा? झुंड हा असा चित्रपट आहे. अजिबात काहीही न लपवलेला. विना मेकअप. नागराजनं जे भोगलं आहे, ते तो मांडतो. तीन दिवसांपूर्वी हा चित्रपट मी पाहिला. अजूनही हा चित्रपट मनातून हलत नाही.’ जितेंद्र जोशी पुढे म्हणाला की, ‘यात तू अमिताभ बच्चन यांना जसं दाखवलं आहेस तसा बच्चन आजपर्यंत कधी पहिलाच नाही. अमिताभ बच्चन यांना ‘बच्चनगिरी’ करूच दिली नाही नागराजने.’ ‘सगळी नवीन पोरं आहेत. गेल्या काही वर्षांत असा परफॉर्मन्स पाहिलेलाच नाही. काय टीम आहे. ही कमाल फक्त नागराजच करू शकतो. तो श्रद्धेविषयी बोलतो, झोपडपट्टीविषयी बोलतो. बच्चन साहेबांच्या तोंडी एक संवाद आहे, ही मुलं इतक्या जोरात दगड फेकतात की काच फुटते. त्यांच्या हातात बॉल दिला तर सर्वांत उत्तम बॉलर बनू शकतात.’ आपली मुलं आणि झोपडपट्टीतील मुलं यात आपण फरक करायला लागतो. जगणं दाखवणारा चित्रपट तो बनवतो,’ अशा शब्दांत जितेंद्र जोशीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो की, ‘झुंड पाहताना रडू येतं..’ ‘अमिताभला स्कोप आहे की नाही?’ असा प्रश्न एका युजरनं विचारला असता चित्रपट बघा, खूप खतरनाक चित्रपट बनवला आहे, ’ असं उत्तर जितेंद्र जोशीनं दिलं. एकाने या लाइव्हमध्ये विचारलं की, झुंडबद्दल एक शब्द सांगा. तर यावर बोलताना जितेंद्र जोशी म्हणाला की, ‘आरसा’. या सिनेमाने आरसा दाखला समाजाचा.’ हे वाचा- राज ठाकरेंच्या भारदस्त आवाजात महागर्जना, ‘हर हर महादेव’ चा टीझर रिलीज नागराज मंजुळेही या लाइव्हमध्ये सहभागी झाला होता. त्याच्याशी बोलताना जितेंद्र म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांना अशा रुपात बघण्याची सवय नाही. महानायकाला आणि महामानवाला एकाच फ्रेममध्ये आणलं आहेस. हे तूच करू शकतोस.’ इथे पाहा जितेंद्र जोशीच्या लाइव्हचा संपूर्ण व्हिडीओ:
जितेंद्र इतकं भरभरून करत असलेलं ‘झुंड’च आणि आपलं कौतुक ऐकून नागराजही भारावून गेला होता. त्याला बोलायला काही शब्दच सुचत नव्हते. ‘तू संवेदनशील अभिनेता आहेस, म्हणून तू केलेलं कौतुक खरं आहे. चित्रपटाचं आणि माझं कौतुक केल्याबद्दल मी आभारी आहे,’ अशा शब्दात नागराजनं जितेंद्र जोशीचे आभार मानले. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन ‘झुंड’ चित्रपट बघा, अशी कळकळीचं आवाहनही जितेंद्र जोशीनं केलं आहे.