मुंबई, 4मार्च- ‘हर हर महादेव…’ या (Har Har Mahadev) गर्जनेने अंगावर शहारा आल्याशिवाय राहात नाही. या गर्जनेने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. प्रत्येक वेळी या गर्जनेने सह्याद्रीचा आसमंत दणाणून सोडला. हाच अद्भुत अनुभव पुन्हा एकदा पडदयावर अनुभवायला मिळणार आहे. झी स्टुडिओजच्या आगामी ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हा टीझर (Teaser) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दमदार आवाजात ऐकायला मिळत आहे. झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित हा चित्रपट आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केलं आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला सर्वांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. आज रिलीज झालेल्या या टीझरची प्रचंड चर्चा सुरु आहे. या टीझरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. राज ठाकरे यांच्या भारदस्त आवाजात हा टीझर ऐकून सर्वांच्याच अंगावर शहारा येत आहे. हर हर महादेव टीझर- ‘जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू, आणि मंदिरांना तडा गुन्हा नव्हता. जेव्हा सह्याद्रीला कडा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे… ही अठरापगड आरोळ्यांची,आणि आपल्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे…’ असा जबरदस्त टीझर राज ठाकरे यांच्या आवाजात ऐकायला मिळत आहे.
कोरोना महामारीमुळे इतरांप्रमाणेच चित्रपटगृहांवरसुद्धा काही बंधने होती. परंतु नुकतंच महाराष्ट्र सरकारने ठराविक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वच लोक आनंदी होते. त्यांनतर आता रिलीज झालेल्या या जबरदस्त टीझरने सर्व लोकांचा आनंद द्विगुणित केला आहे.

)







