मुंबई, 24 ऑक्टोबर- ‘इंडियन आयडॉल’ या रिऍलिटी शोचा 12 वा सीजन प्रचंड लोकप्रिय झाला होता. यामधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. त्यातीलच एक म्हणजे राजस्थानच्या एका छोट्याशा गावातून आलेला सवाई भट्ट होय. गायनाचं कोणतही अधिकृत शिक्षण नसताना केवळ आपल्या लोककलेच्या जोरावर सवाईने सर्वांनाच थक्क केलं होतं. त्याच्या खणखणीत आवाजाची सर्वांनाच भुरळ पडली होती. या शोचा तो विजेता ठरला नसला तरीही त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शो संपल्यानंतरही सवाई भट्ट अनेक अल्बम्स आणि लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दिसून येत आहे. आज आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर सवाईने नवी कोरी कार खरेदी केली आहे. ‘इंडियन आयडॉल 12’ मध्ये सवाई भट्टने सहभाग घेतला होता. या शोमध्ये तो जवळजवळ टॉप 9 मध्ये पोहोचला होता. त्याने आपल्या आवाजाने फक्त परीक्षकांनाच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांना वेड लावलं आहे. आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर सवाईने एक खास ओळख निर्माण केली आहे. इंडियन आयडॉलमुळे सवाई भट्टचं आयुष्य चांगल्या अर्थाने बदललं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इंडियन आयडॉलमध्ये येण्यापूर्वी सवाईची आर्थिक-कौटुंबिक परिस्थिती फारच हलाखीची होती. परंतु आज आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर सवाईने आपल्या आयुष्याची घडी बसवली आहे. सध्या तो आपल्या आयुष्यात चांगली प्रगती करत आहे. (हे वाचा: Bigg Boss 16: अंकितने प्रियांकासोबतच्या नात्यावर म्हटलं असं काही…करण जोहरसोबत सर्वच झाले चकित **)** आज सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण दिवाळीचा मनसोक्त आनंद घेत आहेत. दरम्यान अनेक लोक नवनवीन वस्तूंची खरेदीदेखील करत आहेत. आज इंडियन आयडॉल फेम गायक सवाई भट्टनेदेखील नवी कार खरेदी केली आहे. सवाईने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपल्याला प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आणि सवाईने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शो पूर्वी असं होतं सवाई भट्टचं आयुष्य- सवाई भट्टने आपल्या खणखणीत आवाजाने संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. मात्र सवाई हा शो मध्ये येण्यापूर्वी गावागावात जाऊन आपलं पोट भरत होता. सवाई हा हा राजस्थानमधील एका छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. तो या शोपूर्वी गावागावात जाऊन कठपुतलीचं शो करत होता. मात्र त्यातूनही त्याला जेमतेम पैसे मिळत होते. कारण आजकाल ही कला नाहीशी होत आहे. आधुनिक जगात हे शो आता दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे इतकं करूनही त्याला आपल्या कुटुंबाच पोट भरणं कठीण होत होतं. असं म्हटलं जातं कि त्यानं राजस्थान सरकारकडे मदत मागितली होती. मात्र त्याला कोणतीच मदत मिळाली नव्हती.
इंडियन आयडॉल 12 हा शो जितका विवादित राहिला तितकाच तो लोकप्रियसुद्धा झाला होता. लोकप्रियतेमुळे हा सीजन जास्त महिने सुरु ठेवण्यात आला होता. या शोमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, अंजली गायकवाड, निहाल तौरो, आशिष कुलकर्णी, शण्मुखप्रिया आणि सवाई भट्ट यांना खास ओळख मिळाली होती. हे सर्व स्पर्धक जवळजवळ शोच्या शेवट्पर्यंत टिकून होते. त्यांनतर ग्रँड फिनालेच्या काही दिवसांआधी यातील काही स्पर्धक बाहेर गेले होते. मात्र तोपर्यंत संपूर्ण जगात यांनी आपल्या आवाजाचा जादू पसरवला होता.