नवी दिल्ली, 21 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोना काळात केलेल्या मदतीने तो अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. देशभरात अनेक मजूरांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी सोनूने मोठी मदत केली. त्याच्या या कार्याचं प्रवासी मजूरांसह संपूर्ण देश कौतुक करत आहे. त्याला खऱ्या आयुष्यातील 'हिरो' मानलं जात आहे. नुकतंच सोनूने केलेल्या चांगल्या कामाने प्रेरित होऊन हैदराबादमधील एका व्यक्तीने अॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू केली आहे. त्या व्यक्तीने सोनू सूदच्या नावानेच ही सेवा सुरू केली आहे.
शिवा असं अॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. शिवा व्यवसायाने एक जलतरणपटू आहे. त्याने 100 हून अधिक लोकांना तलावात उडी मारून आत्महत्या करणाऱ्यापासून वाचवलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये तो अतिशय चर्चेत आहे. त्याच्या या चांगल्या कामामुळे त्याला डोनेशनही मिळू लागलं. शिवाने सुरू केलेल्या अॅम्बुलन्स सर्व्हिसचं नाव 'सोनू सूद अॅम्बुलन्स सर्व्हिस' असं ठेवलं आहे. याचं उद्धाटनही स्वत: सोनूने केलं आहे. शिवाच्या या कामासाठी सोनूने त्याचं कौतुक केलं असून, त्याला अशाप्रकारे चांगलं काम सुरू ठेवण्याचं सांगितलं आहे.
यावेळी बोलताना सोनूने सांगितलं की, आपल्याला शिवासारख्या आणखी अनेक लोकांची गरज आहे. जे असं चांगलं काम करण्यासाठी आमची मदत करतील. या उद्धाटनात सामिल झाल्याचा अतिशय आनंद झाल्याचं सांगत, त्याने शिवाचे आभार मानले आहेत. सोनू सूद यांच्या कामाने प्रेरित होऊन या अॅम्बुलन्स सर्व्हिसला सोनू सूद नाव दिल्याचं शिवाने सांगितलं आहे.
Our first step.... Miles to go. Thank you sir. https://t.co/K2dTpTJWhR
— sonu sood (@SonuSood) January 20, 2021
ही अॅम्बुलेन्स सर्व्हिस लोकांचा जीव वाचवण्यासह पोलिसांची मदतही करेल. शिवा अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतो. त्याने ही रेस्क्यू सर्व्हिस, त्याच्या छोट्या भावाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सुरू केली आहे. दरम्यान, तेलंगाणातील सिद्धिपेट जिल्ह्यात लोकांनी सोनू सूदला खऱ्या आयुष्यातील हिरो मानत, त्याच्या कामाने प्रेरित होऊन, सोनूच्या नावे एक मंदिर उभारलं आहे. लोक त्याला देवाचं रूप मानतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.