मुंबई, 13 जानेवारी : जवळपास तीन दशकं आपल्या उत्तम अभिनयानं आणि नृत्य कौशल्यानं बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणारा अभिनेता गोविंदा (Govinda) गेली अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर आहे. त्यानंतरच्या काळात त्यानं राजकारणातही आपलं नशीब आजमावलं; पण तिथंही तो फारसा रमला नाही. अलीकडच्या काळात छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोजमधून अधूनमधून हजेरी लावणाऱ्या गोविंदानं स्वतःचं ‘गोविंदा रॉयल्स’ (Govinda Royalles) नावाचं यू-ट्यूब चॅनेल (Youtube Channel) सुरू केलं आहे. तिथं तो (Singing Talent) चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा आणि मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. पण उलट तो ट्रोल झाला आहे. गोविंदानं नुकतंच आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर ‘हॅलो’ (Hello) नावाच्या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. हे गाणं त्यानं रोहित राज सिन्हाच्या मदतीनं बनवलं आहे. त्याचे शब्द त्याने स्वतः लिहिले असून ते गायलंही आहे. यावर त्यानं नृत्यही केलं आहे. हा त्याचा दुसरा म्युझिक व्हिडिओ आहे. गोविंदानं आपला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही (Instagram) पोस्ट केला आहे. त्या पोस्टवर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. हे वाचा - जेवणासाठी करावा लागत होता संघर्ष, स्ट्रगल आठवल्यानंतर अभिनेता भावुक या गाण्याच्या सुरुवातीला तो पांढऱ्या रंगाच्या मजेशीर ड्रेसमध्ये आपल्या खास स्टाइलमध्ये नृत्य करताना दिसत आहे. यात तो पियानो वाजवतानाही दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या प्रयत्नांना दाद दिली आहे; मात्र अनेकांना त्याचं गाणं अजिबात आवडलेलं नाही. त्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
“गोविंदा आपली खासियत विसरून भलतंच काही तरी करत आहे, यामुळं तो आता हळूहळू सर्वांच्या विस्मरणात जाण्याच्या तयारीत आहे”, असं अनेकांनी म्हटलं आहे. एकानं त्याची तुलना चक्क ढिंचॅक पूजाशी केली असून, “असं काही तरी करून कष्टानं मिळवलेली इज्जत वाया घालवू नको”, असा सल्ला दिला आहे. तुम्ही हे असं काही तरी करत आहात हे बघून खूप विचित्र वाटतं. तुम्ही स्वतःच स्वत:ची कारकीर्द हास्यास्पद ठरवत आहात, असं वाटत असल्याचं एकानं म्हटलं आहे. हे वाचा - ‘दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार…’; ठाकरे सरकारवर अभिनेत्याची कडक पोस्ट याआधीही गोविंदानं ‘चश्मा चढाकर’ आणि ‘टिप टिप बरसा पानी’ ही गाणी प्रदर्शित केली होती. त्यावरही चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी त्याचं कौतुक केलं होतं, तर काहींनी त्यांची टिंगल केली होती. असलं काही तरी करू नये आणि आपली आतापर्यंत मिळवलेली प्रसिद्धी, प्रतिष्ठा अशी धुळीला मिळवू नये असा सल्ला त्याला प्रेक्षकांनी दिला आहे.