मुंबई, 14 सप्टेंबर : आजकाल आम्ही तुम्ही सगळेच आपल्या फोटोंमध्ये भरमसाठ फिल्टर्स वापरतो. त्याशिवाय आपण फोटोच काढत नाही. कलाकार सुद्धा सर्रास फिल्टर्स वापरताना दिसतात. फिल्टर्सचा उपयोग खरा चेहरा झाकण्यासाठी केला जातो. फिल्टर्स हे आभासी असतात. त्यामुळे आपलं खरं सौंदर्य लपलं जातं. आता याच मुद्यावर अभिनेत्री हेमांगी कवीने भाष्य केलं आहे. तिने एक पोस्ट शेअर करत फिल्टर्स वापरण्याबाबत तिचं मत व्यक्त केलं आहे. हेमांगी कवी आपल्या अभिनयासोबतच विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल्याने नेहमी चर्चेत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. आजही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका खूप महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणतेय कि, ‘जर तुम्ही फिल्टरशिवाय स्वतःला आवडत नाही तर जगाकडून ती अपेक्षा का करता’ असे म्हणत तिने सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. हेमांगीने लिहिलंय कि, ‘‘मी माझ्या पोस्ट, रील किंवा अगदी माझ्या स्टोरीजमध्ये कोणतेही फिल्टर कधी वापरत नाही. मी माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवर कोणत्याही मेकअपशिवाय दिसणं पसंत करते. जेव्हा माझे फॉलोअर्स मला कोणत्याही मेकअपशिवाय बघतात आणि पसंत करतात तेव्हा मला मनापासून आनंद होतो. त्यापैकी काहींना ते आवडते आणि तर काहींना नाही. ठीक आहे. मेकअप किंवा फिल्टरशिवाय त्यांनी मला पसंतच केलं पाहिजे अशी मी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही किंवा त्यांच्याकडून अशी अपेक्षा करू शकत नाही. त्यातील काही माझी खिल्ली उडवतात, घाणेरड्या, द्वेषपूर्ण कमेंट्स देतात. पण त्याचा मला काही फरक पडत नाही. याउलट, ज्यांना मला मेकअप, फिल्टरशिवाय पाहायला आवडते त्यांच्याकडून मला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळतो.’’
तिने पुढे लिहिलंय कि, ‘‘हे फिल्टर वापरणे कोणाला सोयीचे वाटत असल्यास ते देखील ठीक आहे. त्यात गैर काहीच नाही. पण दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही तुमचा मेकअप काढता आणि कोणत्याही फिल्टर शिवाय स्वतःला आरशात पाहता तेव्हा तुम्ही जसे आहेत तसेच स्वतःवर प्रेम केले पाहिजे! तुम्हाला दुःखी होण्याची काहीही गरज नाही. मला तुम्हाला स्वतःला जसे आहात तसे ‘स्वीकारा असं अजिबात म्हणायचं नाही.’’ हेही वाचा - Sukh mhnaje nakki kay asta : अखेर शालिनीच्या पापांचा घडा भरणार; जयदीप गौरी देणार ‘ही’ शिक्षा ‘‘फक्त आरशात स्वतःला पहा आणि स्वतःला ओळखा. जेव्हा तुम्ही मेकअपमध्ये असता किंवा तुमच्या फोटो, व्हिडिओंवर फिल्टर करता त्यासारखंच आताही कोणत्याही फिल्टरशिवाय स्वतःवर तेवढेच प्रेम करा!’’ हेमांगीने या व्हिडिओमधून खूपच महत्वाचा मेसेज दिला आहे. तिला यासाठी अनेकांनी कमेंट करत पाठींबा दर्शवला आहे. ‘तू आम्हाला अशीच आवडतेस’, तुझं हे बोलणं ऐकून खूप छान वाटत आहे’ अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. हेमांगीने या वेळी सांगितलेला मुद्दा चाहत्यांना चांगलाच भावला आहे.